क्रिकेटपटूंच्या मध्यस्थांसाठी सनदशीर मान्यता प्रक्रिया अमलात आणण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील होते. मात्र वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या विरोधापुढे ही प्रक्रिया मागे पडल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी मध्यस्थांसाठी मान्यता प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला होता. मात्र वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या वाढत्या दबावामुळे ही प्रक्रिया प्रत्यक्षात येऊ शकली नाही. आयपीएलमधील नुकत्याच बाहेर आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
खेळाडूंच्या मध्यस्थांसाठी एक योजना तयार करण्यात येत असून, याद्वारे हे मध्यस्थ बीसीसीआयच्या कार्यक्षेत्राखाली येतील. असे झाल्यास मध्यस्थांच्या कामकाजावर व्यवस्थित निगराणी करता येईल.
भारताच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारतीय संघाचे ज्या हॉटेलात वास्तव्य होते, त्याच हॉटेलमध्ये ५-६ मध्यस्थ राहात असल्याचे वृत्त होते. हे मध्यस्थ क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांप्रमाणे वागत होते. हा प्रकार धक्कादायक आहे. जर बीसीसीआय मध्यस्थांना मान्यता देऊ शकली तर त्यांना बीसीसीआयच्या नियमावलीनुसार काम करावे लागले. सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाही.
खेळाडू आणि संशयास्पद व्यक्ती यांच्यातील संबंधाबाबत गव्हर्निग काऊन्सिलचे सदस्य रवी शास्त्री यांनी बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. खेळाडूंना अशा व्यक्तींपासून रोखण्यासाठी बीसीसीआयने योग्य कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले.