घरच्या मैदानावर सलग अकरा विजयांची परंपरा खंडित झाल्यामुळे, नव्या प्रेरणेने खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सवर १२  धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांनी राजस्थानला ३७ धावांची सावध सलामी दिली. मोहित शर्माने स्थिरावलेल्या रहाणेला  (२३) बाद केले. कर्णधार स्टीव्हन स्मिथला रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. पाठोपाठ शेन वॉटसनलाही जडेजाने परतीचा रस्ता दाखवला. सीमारेषेरेवर ड्वेन ब्राव्होने अफलातून झेल टिपत वॉटसनची खेळी संपुष्टात आणली. करुण नायर (१०) आणि दीपक हुडाला (१५) बाद करत रवींद्र जडेजाने सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला.  जेम्स फॉकनर आणि संजू सॅमसन यांनी ३३ धावांची भागीदारी करत विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र ड्वेन ब्राव्होने सॅमसनला बाद करत ही जोडी फोडली. सॅमसनने १७ चेंडूत २६ धावांची खेळी केली. जेम्स फॉकनरचा शानदार झेल टिपत ब्राव्होने राजस्थान डोके वर काढू शकणार नाही याची काळजी घेतली. राजस्थानने ९ बाद १४५ धावा केल्या. चेन्नईतर्फे रवींद्र जडेजाने ११ धावांत ४ बळी घेतले.
तत्पूर्वी, चेन्नईने ब्रेंडन मॅक्क्युलमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १५७ धावांची मजल मारली. ड्वेन स्मिथ (६) अंकित शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. चेन्नईचा हुकमी एक्का सुरेश रैना या सामन्यातही अपयशीच ठरला.  मॅक्क्युलमने फॅफ डू प्लेसिसच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. चोरटी धाव घेण्याचा डू प्लेसिसचा प्रयत्न फसला.  शतकाकडे कूच करणाऱ्या मॅक्क्युलमला मॉरिसने बाद केले. त्याने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ चेंडूत ८१ धावांची खेळी साकारली.  महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन ब्राव्हो जोडीने १५ चेंडूत २८ धावांची भागीदारी केली.   
संक्षिप्त धावफलक  
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ५ बाद १५७ (ब्रेंडन मॅक्क्युलम ८१, फॅफ डू प्लेसिस २९, ख्रिस मॉरिस ३/१९) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ९ बाद १४५ (शेन वॉटसन २८, संजू सॅमसन २६; रवींद्र जडेजा ४/११, मोहित शर्मा ३/२५).