कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने दिलेले ‘सर’ हे टोपण नाव रवींद्र जडेजा याने  सार्थ ठरविले. त्याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे (२० धावांत ३ बळी व नाबाद ३६ धावा) धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सवर पाच चेंडू व चार गडी राखून मात केली.
ईडन गार्डन्सवर खचाखच भरलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत कोलकाताच्या खेळाडूंनी आत्मघातकी फलंदाजीचा प्रत्यय घडविला. त्यामुळे निर्धारित २० षटकांत त्यांना ९ बाद ११९ धावांपर्यंतच मजल गाठता आली. हे सोपे आव्हान पेलविताना चेन्नईची एक वेळ ६ बाद ८९ अशी स्थिती झाली होती. तथापि जडेजा याने केलेल्या चौफेर टोलेबाजीमुळेच चेन्नईला २० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विजय मिळविता आला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची ५.५ षटकांत बिनबाद ४६ अशी चांगली सुरुवात झाली होती मात्र गौतम गंभीर (५ चौकारांसह २५) बाद झाला आणि त्यांच्या डावास खिंडार पडले. पाठोपाठ जॅक कॅलीस खाते उघडण्यापूर्वीच धावबाद झाला. द्वायने ब्राव्हो याने इऑन मोर्गन (२) याला बाद केले. याच षटकात दुसरी धाव शक्य नसतानाही युसूफ पठाण धावला आणि धावबाद झाला. सलामीस आलेल्या पठाणने चार चौकारांसह २२ धावा केल्या. मनोज तिवारी (१३) व देवव्रत दास (१९) यांनी २७ धावांची भर घातली. तथापि ही जोडी फुटल्यानंतर पुन्हा कोलकाताचा डाव घसरला. शेवटच्या फळीत सुनील नरेन याने दोन षटकारांसह १३ धावा केल्यामुळेच कोलकाता संघास तीन आकडी धावांपलीकडे पोहोचता आले. चेन्नई संघाकडून रवींद्र जडेजा (३/२०) व रवीचंद्रन अश्विन (२/२१) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
चेन्नईच्या डावाचा प्रारंभ मायकेल हसी व रवीचंद्रन अश्विन यांनी केला. हसी याने दोन चौकार व एक षटकारासह ४० धावा केल्या. त्याची ही दमदार खेळी होऊनही कोलकाता संघाच्या अचूक माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांवर खूपच नियंत्रण आले होते. अश्विन (११), मुरली विजय (२), सुरेश रैना (७), धोनी (९), सुब्रमणियम बद्रीनाथ (६) हे तंबूत परतल्यामुळे चेन्नईचा ६ बाद ८९ असा अडचणीत आला होता. जडेजा याने त्यानंतर खेळाची सूत्रे स्वत:कडे ठेवीत आक्रमक खेळ केला. त्याने कॅलीस याच्यासह सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने ब्राव्होच्या साथीत ३५ धावांची अखंडित भागीदारी करीत संघाची विजयश्री खेचून आणली. त्याने केवळ १४ चेंडूंत नाबाद ३६ धावा करताना तीन चौकार व तीन षटकार अशी आतषबाजी केली. त्याने संघाचा विजय षटकारानेच साजरा केला आणि सामन्याचा मानकरी हा किताबही पटकाविला. ब्राव्होने नाबाद ७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ९ बाद ११९ (गौतम गंभीर २५, युसुफ पठाण २५, रवींद्र जडेजा ३/२०) पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : ६ बाद १२४ (माइक हसी ४०, रवींद्र जडेजा नाबाद ३६, सचित्र सेनानायके १/१८)
सामनावीर : रवींद्र जडेजा.
ब्रेट ली, कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज
तुमच्या सगळ्यांच्या प्रेमपूर्वक संदेशांसाठी मनपूर्वक आभार. मला खात्री आहे की कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सर्व खेळाडू तुमच्या शुभेच्छांचा सकारात्मक विचार करतील. आम्ही सगळे विजयासाठी जीव ओतून प्रयत्न करत आहोत. आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.