आयपीएल स्पर्धेतील पहिले दोन सामने आम्ही गमावले असले तरी आमचे आव्हान संपलेले नाही. उर्वरित सामन्यांमध्ये आम्ही अव्वल दर्जाची कामगिरी करुन दाखवू, असा आत्मविश्वास पुणे वॉरियर्स संघाचे साहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी सांगितले.
आयपीएल स्पर्धेत पुणे वॉरियर्सला पहिल्या लढतीत हैदराबाद सनराईज संघाकडून, तर दुसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये पुण्याच्या फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. संघाच्या कामगिरीबाबत पत्रकारांशी संवाद साधताना अमरे म्हणाले,‘‘पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळपट्टी गोलंदाजीस अनुकुल होती.  अर्थात पराभवाचे खापर मी खेळपट्टीला देणार नाही. आमच्या फलंदाजांनी अपेक्षेइतकी एकाग्रता दाखविली नाही. त्यांनी खेळपट्टीवर टिकून ठेवण्याचे धोरण स्वीकारले असते तर धावा आपोआप मिळत गेल्या असत्या.’’
आगामी लढतींकरिता संघात काही आमूलाग्र बदल करणार काय, असे विचारले असता अमरे म्हणाले,‘‘संघात आमूलाग्र बदल करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. थोडेफार बदल होतातच. तथापि, आहे त्या खेळाडूंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते चमक दाखवतील अशी मला खात्री आहे.’’
पंजाबविरुद्धच्या लढतीत पुण्याचा अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग पाठीच्या दुखण्यामुळे सहभागी झाला नव्हता. त्याच्याविषयी आम्रे म्हणाले,की त्याच्यावर सहा दिवस फिजिओंच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाणार आहेत. आणखी एक-दोन सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र एक आठवडय़ानंतर तो निश्चित तंदुरुस्त होईल अशी खात्री आहे.