* पुणे वॉरियर्सला २२ धावांनी हरवून सनरायजर्सची विजयी सलामी
* डेल स्टेनचे १९व्या षटकांत ३ बळी
* थिसारा परेराची अष्टपैलू कामगिरी
आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाचा पदार्पणाच्या सामन्यातच तेजस्वी ‘सूर्योदय’ झाला. १२७ धावांचे आव्हान पेलणाऱ्या पुणे वॉरियर्सना एकामागोमाग धक्के देत हैदराबादने घरच्या चाहत्यांना विजयाची मेजवानी दिली. अमित मिश्रा, डेल स्टेन आणि थिसारा परेरा यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पुण्याचा डाव १०४ धावांत गुंडाळत हैदराबादने २२ धावांनी विजय साकारला.
पुणे वॉरियर्सची सुरुवातही डळमळीत झाली. रॉबिन उथप्पा (२४) आणि मनीष पांडे (१५) यांनी ३६ धावांची सलामी दिल्यानंतर पुण्याचा डाव गडगडला. त्यामुळे ११.२ षटकांत पुणे वॉरियर्सची ४ बाद ५० अशी स्थिती झाली होती. मार्लन सॅम्युएल्स ५ आणि युवराज सिंग अवघ्या २ धावा काढून माघारी परतला. अभिषेक नायर आणि रॉस टेलर यांनी आक्रमक फलंदाजी करून पुण्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण एकापाठोपाठ दोघांनाही तंबूची वाट धरावी लागल्याने पुणे संघ ६ बाद ८६ अशा बिकट अवस्थेत सापडला. ११ चेंडूत २३ धावांची आवश्यकता असताना डेल स्टेनने चार चेंडूत तीन विकेट्स मिळवत पुण्याचा डाव १०४ धावांवर संपुष्टात आणला आणि हैदराबादला २२ धावांनी विजय मिळवून दिला. अमित मिश्राने १९ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. थिसारा परेराने अष्टपैलू कामगिरी करत ३० धावा आणि दोन विकेट्स टिपल्या.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही. पुणे वॉरियर्सच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना २० षटकांत ६ बाद १२६ धावाच करता आल्या. पार्थिव पटेल (१९) आणि अक्षत रेड्डी (२७) यांनी सलामीसाठी रचलेली ३४ धावांची भागीदारी हैदराबादच्या डावातील सर्वोत्तम ठरली.  हैदराबादचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने २९ धावांमध्ये दोन विकेट्स टिपल्या.
संक्षिप्त धावफलक : सनरायजर्स हैदराबाद- २० षटकांत ६ बाद १२६ (थिसारा परेरा ३०, अक्षत रेड्डी २७; अशोक दिंडा २/२९) पराभूत वि. पुणे वॉरियर्स : १८.५ षटकांत सर्व बाद १०४ (रॉबिन उथप्पा २४, अभिषेक नायर १९; डेल स्टेन ३/११, अमित मिश्रा ३/१९). सामनावीर : अमित मिश्रा