अमित मिश्राचे १९वे षटक अजूनही डोळ्यांसमोर ताजे आहे. सामन्याच्या निकालाला कलाटणी लावणाऱ्या त्या षटकात अमितने हॅट्ट्रिकसहित चार बळी घेतले. त्यामुळे अनपेक्षितपणे गहुंजेमध्ये सनरायजर्स हैदराबादचा उदय झाला. पण शुक्रवारी हैदराबादची घरच्या मैदानावर सातव्या सामन्यात गाठ पडणार आहे ती आयपीएलमधील सर्वात अनिश्चित संघ किंग्ज इलेव्हन पंजाबशी. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील नवा संघ असूनही हैदराबादची घोडदौड नक्कीच कौतुकास्पद आहे.
जागतिक क्रिकेट क्रमवारीतील अव्वल गोलंदाज डेल स्टेन, इशांत शर्मा, थिसारा परेरा आणि लेग-स्पिनर अमित मिश्रा या हैदराबादच्या गोलंदाजांनी चारही विजयांमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांपैकी चार विजय आणि दोन पराजय यांच्यासहित हैदराबादच्या खात्यावर ८ गुण जमा आहेत. गोलंदाजी हे हैदराबादचे बलस्थान असल्याचे पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा निष्पन्न झाले.
बुधवारच्या सामन्यात सनरायजर्सचे १२० धावांचे आव्हान मुळीच कठीण नव्हते. परंतु मिश्राने कमाल केली. पाच चेंडूंत हॅट्ट्रिकसह चार बळी घेत त्याने पुण्याच्या आशा-आकांक्षांपुढे पूर्णविराम दिला. त्यामुळेच हैदराबादला ११ धावांनी रोमहर्षक विजय प्राप्त करता आला. मिश्राने (४/१९) दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर बळी मिळवत पुण्याचा डाव १९ षटकांत १०८ धावांत गुंडाळला. मिश्राने फक्त गोलंदाजीतच नव्हे तर आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना आपल्या उपयुक्त धावांचे योगदानही दिले. परंतु फलंदाजी ही सनरायजर्सची प्रमुख चिंतेची बाब आहे. शिखर धवन बोटाच्या दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. त्यामुळे कप्तान कुमार संगकारा, कॅमेरून व्हाइट आणि थिसारा परेरा यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी आहे.
दुसरीकडे गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या रंगतदार सामन्यात चार धावांनी आश्चर्यकारक विजय मिळविल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा आत्मविश्वास दुणावला आहे. पंजाबने १५८ धावांचे विजयासाठीचे आव्हान देताना कोलकात्याला ९ बाद १५३ धावांवर रोखले. कोलकाताकडून गौतम गंभीर आणि ईऑन मॉर्गन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. आयपीएलच्या सहाव्या हंगामातील पहिल्याच सामन्यात खेळणाऱ्या मनप्रीत गोनीने आपल्या नेत्रदीपक कामगिरीने सामन्याचे चित्र पालटले. गोनीने प्रथम १८ चेंडूंत ४२ धावांची दिमाखदार खेळी उभारली. मग पंजाबच्या धावसंख्येचा पिच्छा पुरवणाऱ्या गंभीरला बाद करण्याची किमया साधली.
दोन लागोपाठच्या सामन्यांतील पराभवांनंतर पंजाबने कोलकाताविरुद्ध आपला विजय साजरा केला. आतापर्यंतच्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकणाऱ्या पंजाबला आपला हाच रुबाब राखत विजयाची मालिका पुढे चालू ठेवायची आहे. पंजाबने पुणे वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवत आयपीएलच्या हंगामाचा जोशात प्रारंभ केला. पण त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांच्या वाटय़ाला पराभव आले. अ‍ॅडम गिलख्रिस्ट आपल्या दर्जाला साजेशी फलंदाजी करू शकलेला नाही. त्यामुळे डेव्हिड हसी, मनदीप सिंग, मनन व्होरा, डेव्हिड मिलर आणि गुरकिराट सिंग यांच्यावर पंजाबच्या फलंदाजीची मदार असेल. पंजाबच्या वेगवान गोलंदाजीचा भार प्रवीण कुमार आणि रयान हॅरिसवर आहे. याशिवाय अझर मेहमूद आणि परविंदर अवाना त्यांच्या दिमतीला आहेत. लेग-स्पिनर पीयूष चावलाला आपल्या क्षमतेला साजेसा प्रभाव दाखवू शकलेला नाही.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून.