एकापेक्षा एक सरस खेळाडू आणि मार्गदर्शकांचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या आठव्या पर्वात सलग चौथ्या सामन्यात चारी मुंडय़ा चीत होण्याची नामुष्की पत्करावी लागली. वानखेडे स्टेडियमवर ड्वेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी मुंबई इंडियन्सच्या आव्हानात्मक धावसंख्येची तमा न बाळगता जोरदार आक्रमणाचे हत्त्यार उगारले आणि भक्कम पाया रचला. त्यानंतर सुरेश रैनाने उर्वरित फलंदाजांच्या साथीने सावधपणे खेळत चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा कळस चढवला. चेन्नईने ६ विकेट्स राखून मुंबईला हरवले.
चेन्नईचे सलामीवीर स्मिथ आणि मॅक्क्युलम यांनी प्रारंभीपासूनच वादळी फटकेबाजी करीत चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि मुंबईकर क्रिकेटरसिकांना खूष केले. या जोडीने चार षटकांत धावफलकावर अर्धशतक नोंदवले, तर ६.५ षटकांत शतक गाठले. या झंझावातापुढे विजय फार काळ लांबणार नाही, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, आठव्या षटकात हरभजन सिंगने मॅक्क्युलम आणि स्मिथचे बळी मिळवत कमाल केली. स्मिथने ३० चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावा केल्या, तर मॅक्क्युलमने २० चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. या जोडीने १०९ धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईने चेन्नईच्या धावांचा तुफानी आलेख खाली आणला. मग सुरेश रैनाने नाबाद ४३ धावा काढून चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याआधी, कर्णधार रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या अर्धशतकांच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ बाद १८३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी, परंतु लेंडल सिमन्स, पार्थिव पटेल आणि कोरे अँडरसन लवकर तंबूत परतल्यामुळे त्यांची ३ बाद १२ अशी केविलवाणी अवस्था झाली. मात्र रोहितने हरभजनसोबत चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव सावरला. हरभजनला (२४) मोहित शर्माने जेरबंद केले. मग रोहितच्या साथीला पोलार्ड येताच धावफलकाने वेग धारण केला. पोलार्ड-रोहितने पाचव्या विकेटसाठी फक्त ३३ चेंडूंत ७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. नेहराने रोहितला तंबूची वाट दाखवली. रोहितने ३१ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. त्यानंतर पोलार्डने अंबाती रायुडू (२९) सोबत सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी साकारली. पोलार्डने ३० चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. ब्राव्होने अखेरच्या षटकात रायुडू आणि पोलार्डला माघारी पाठवले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ७ बाद १८३ (रोहित शर्मा ५०, किरॉन पोलार्ड ६४, अंबाती रायुडू २९; आशिष नेहरा ३/२३, ड्वेन ब्राव्हो २/३०) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १६.४ षटकांत ४ बाद १८९ (ड्वेन स्मिथ ६२, ब्रेंडन मॅक्क्युलम ४६, सुरेश रैना नाबाद ४३ ; हरभजन सिंग २/४४);
सामनावीर : आशिष नेहरा