आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या गुणतालिकेतील तळाच्या चार संघांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा समावेश आहे. त्यामुळे बाद फेरीचे स्वप्न शाबूत राखण्यासाठी प्रत्येक विजय मोलाचा आहे, याची जाणीव अर्थात दोन्ही संघांना सोमवारी होणाऱ्या लढतीतसुद्धा असेल.
आतापर्यंत सहा सामन्यांत चार पराभव पत्करणारा पंजाबचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. हैदराबादची गुणस्थितीसुद्धा तशीच असली तरी सरस धावगतीमुळे हा संघ पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आपल्या मागील लढती गमावल्या आहेत.
शनिवारी चेन्नई सुपर किंग्जचे १९३ धावांचे लक्ष्य पेलताना पंजाबच्या फलंदाजांना जेमतेम ९ बाद ९५ धावा करता आल्या होत्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील पंजाबची ही दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. पंजाबची फलंदाजी ही फक्त कागदावरच बलाढय़ असल्याचे या सामन्यात सिद्ध झाले. आघाडीच्या अध्र्या संघाला एकूण फक्त ४९ धावाच करता आल्या.
वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांना पंजाबला विजयपथावर राखण्यात अपयश येत आहे. पंजाबची गोलंदाजीचीसुद्धा तीच गत आहे. वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन अपयशी ठरला आहे. मागील सामन्यात ४ षटकांत त्याला ४० धावा मोजाव्या लागल्या होत्या.
हैदराबाद सनरायझर्सच्या फलंदाजीची धुरा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सलामीवीर शिखर धवन यांच्यावर अवलंबून आहे. हे दोघेही चमकदार कामगिरी करीत असले तरी मधल्या फळीतील फलंदाजांकडून योग्य पाठबळ मिळत नाही.
शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात डेल स्टेन आणि ट्रेंट बोल्ट या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. या पाश्र्वभूमीवर पुढील सामन्यांमध्ये हैदराबादची कामगिरी सुधारेल, अशी आशा धरूया.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा. पासून
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स.