चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रोमहर्षक लढतीत पराभव करून आपला ठसा उमटवला. आयपीएलच्या सहाव्या पर्वाची पराभवाने सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने ‘रूक जाना नहीं तू कभी हार के..’ला साजेशीच आपली घोडदौड सुरू ठेवली. चेन्नई सुपर किंग्जने मग किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बंगळुरूला हरवून आपला विजयी आवेश जोपासला. सोमवारी चेन्नईची गाठ पडत आहे ती आयपीएलमधील तळागाळाच्या संघांपैकी एक पुणे वॉरियर्सशी. या पाश्र्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्ज रुबाबात आपला तिसरा विजय नोंदवेल, अशी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धचा विजय वगळल्यास पुणे वॉरियर्सने आयपीएलच्या सहाव्या पर्वातील चारपैकी तीन सामने गमावले आहेत. दोन वेळा आयपीएल विजेतेपद प्राप्त करणारा चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर पुण्याचा संघ आठव्या. पुणे वॉरियर्सचा संघ झगडत असताना चेन्नईचा संघ चेपॉकच्या घरच्या मैदानावर वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मुळीच सोडणार नाही.
फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये चेन्नईचा संघ खंबीर आहे. या पाश्र्वभूमीवर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईविरुद्ध पुण्याचा संघ कोणती व्यूहरचना आखेल, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
माइक हसी आणि मुरली विजय चेन्नईला नेहमीच समर्थ सलामी साकारून देत आहेत. सुरेश रैना, एस. बद्रिनाथ आणि धोनी यांच्यामुळे चेन्नईची मधली फळी गुणवत्ता आणि अनुभव यांनी युक्त अशी आहे. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन अशी फलंदाजीची फळी लांबते. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात जडेजाने सामना जिंकून देणारी लाजवाब खेळी साकारली.
चेन्नईकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचे सुरेख मिश्रण आहे, जे फक्त बळीच घेत नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघांना धावांसाठी झगडायला लावतात. डर्क नेन्स आणि ख्रिस मॉरिस यांनी बंगळुरूविरुद्ध चांगली कामगिरी बजावली होती. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला खेळपट्टीवर त्यांनी फार काळ तग धरू दिला नाही. ब्राव्हो हा दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. याशिवाय आर. अश्विन आणि जडेजा हे फिरकी गोलंदाज चेन्नईकडे आहेत. अ‍ॅल्बी मॉर्केलसुद्धा चेन्नईच्या क्षमतेत भर घालतो.
दुसरीकडे पुण्याच्या फलंदाजीची मदार आहे ती युवराज सिंग, रॉस टेलर, आरोन फिन्च आणि मिचेल मार्शवर. डावखुरा युवराज अद्याप आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवू शकला नसला तरी त्याच्याकडून पुण्याला मोठय़ा अपेक्षा आहेत. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने मैदानावरील आघाडी सांभाळत नेतृत्व करण्याची गरज आहे.
मार्श, भुवनेश्वर कुमार आणि अशोक दिंडा हे पुण्याचे भरवशाचे गोलंदाज आहेत. शनिवारी मुंबईच्या फलंदाजांनी दिंडाच्या गोलंदाजीवर ६३ धावा कुटल्या होत्या. लेग-स्पिनर राहुल शर्माकडूनही पुण्याला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.