सचिन तेंडुलकरला चाळिसाव्या वाढदिवसाची विजयी भेट मुंबई इंडियन्सने त्याला दिली. गोलंदाजांचा भेदक मारा, ड्वेन स्मिथची तडाखेबंद सलामी आणि कर्णधार रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर एक चेंडू आणि ५ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला.
कोलकात्याचा १६० धावांचा पाठलाग करताना मुंबईचे सचिन तेंडुलकर (२) आणि दिनेश कार्तिक (७) हे स्वस्तात बाद झाले. पण ड्वेन स्मिथने ४५ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी साकारत धावसंख्येला चांगला आकार दिला. तो बाद झाल्यावर रोहित शर्मा (३४) आणि किरॉन पोलार्ड (३३) यांनी संघाला विजयाच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचवले, तर हरभजन सिंगने (नाबाद ७) अखेरच्या षटकात षटकार ठोकत सामना मुंबईच्या बाजूने झुकवला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून कोलकात्याने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सलामीवीर युसूफ पठाणच्या तडाखेबंद १९ धावांसह हरभजन सिंगच्या पहिल्याच षटकात २६ धावा लुटत झोकात सुरुवात करून दिली. पण दुसऱ्या षटकात मिशेल जॉन्सनने पठाणला बाद केले आणि त्यानंतर कोलकात्याला धावांची मंदावली. पठाणने ६ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा काढल्या. कर्णधार गौतम गंभीर (२६) आणि जॅक कॅलिस (३७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली खरी, पण तोपर्यंत मुंबईने धावगतीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हे दोघे बाद झाल्यावर ईऑन मॉर्गन (३१) आणि मनोज तिवारी (३३) यांनी चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचत कोलकात्याची धावगती वाढवली व त्यामुळेच कोलकात्याला २० षटकांत ६ बाद १५९ अशी मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १५९ (जॅक कॅलिस ३७; प्रग्यान ओझा २/२१, लसिथ मलिंगा २/२५) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९ .५ षटकांत ५ बाद १६२ (ड्वेन स्मिथ ६२, रोहित शर्मा ३४; सुनीन नरीन ३/१७).
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 25, 2013 4:06 am