खेळपट्टीचा नूर ओळखणे हेच कर्णधाराचे कौशल्य असते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्लीचा कर्णधार जे पी डय़ुमिनीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तळपत्या उन्हात गोलंदाजी स्वीकारणे कितपत योग्य याची चर्चा रंगू लागली. मात्र प्रत्यक्ष मैदानावर अनुभवी झहीर खानच्या पुनरागमनासह बळकट झालेल्या दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक आणि अचूक मारा करत पंजाबला अवघ्या ११८ धावांत रोखले. श्रेयस अय्यर आणि मयांक अगरवाल यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य सहजपणे गाठले आणि दणदणीत विजयाची नोंद केली.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर आणि मयांक अगरवाल यांनी सावध सुरुवात केली. सुरुवातीला या जोडीने कोणताही धोका पत्करला नाही. मात्र स्थिरावल्यानंतर पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने पाच गोलंदाजांचा प्रयोग करत विकेट मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र ते अपुरेच ठरले. यंदाच्या हंगामाचे आकर्षण ठरलेल्या मुंबईकर श्रेयस अय्यरने ४० चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली तर मयांक अगरवालने ४० चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या.
पंजाबने मिचेल जॉन्सन, रिशी धवन आणि मुरली विजय यांना विश्रांती देत वीरेंद्र सेहवाग, थिसारा परेरा आणि शार्दूल ठाकूर यांना संधी दिली तर दिल्लीने डॉमिनिक जोसेफऐवजी तंदुरुस्त झहीर खानचा समावेश केला. प्रदीर्घ अनुभव किती प्रभावी ठरू शकतो याचा प्रत्यय झहीरने काही मिनिटांतच दिला. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर झहीरने वीरेंद्र सेहवागला माघारी धाडले. सेहवाग विरुद्ध झहीर या मुकाबल्यात झहीरनेच बाजी मारली. एका बाजूने झहीरने दणका दिलेला असतानाच दिल्लीचा कर्णधार डय़ुमिनीने दुसऱ्या षटकात सूर गवसलेल्या शॉन मार्शला पायचीत केले. त्याने ५ धावा केल्या. झहीरने पुढच्या षटकात युवा मनन व्होराला केदार जाधवकडे झेल देण्यास भाग पाडले. ३ बाद १० अशा अडचणीत सापडलेल्या पंजाबला नॅथन कल्टर-नीलने वृद्धिमान साहाला बाद करत आणखी हादरा दिला. कर्णधार जॉर्ज बेलीने डेव्हिड मिलरला हाताशी घेत २७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ही जोडी स्थिरावतेय असे वाटत असतानाच अमित मिश्राने बेलीला पायचीत केले. त्याने १८ धावा केल्या.
 फटकेबाजी प्रसिद्ध थिसारा परेराने खेळपट्टीवर दाखल होताच पुलचा फटका खेळला. मात्र हा प्रयत्न सौरभ तिवारीच्या हातात विसावला. त्याला ३ धावा करता आल्या. मिलरला अक्षर पटेलने चांगली साथ देत सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. नीलने अक्षरला बाद करत ही जोडी फोडली. त्याने २२ धावा केल्या. त्याच षटकात डेव्हिड मिलरला तंबूचा रस्ता दाखवत पंजाबला डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. मिलरने ४२ धावा केल्या. मिलरच्या संयमी खेळामुळे पंजाबने ११८ धावांची मजल मारली. दिल्लीतर्फे नॅथन कल्टर नीलने २० धावांत ४ बळी घेतले.  

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद ११८ (डेव्हिड मिलर ४२, अक्षर पटेल २२; नॅथन कल्टर नील ४/२०, झहीर खान २/१७) पराभूत विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : १३.५ षटकांत १ बाद ११९ (श्रेयस अय्यर ५४, मयांक अगरवाल ५२; शार्दूल ठाकूर १/३८)
सामनावीर : नॅथन कल्टर नील