संघातील दोन महत्त्वाचे गोलंदाज खेळत नसतील तर विजयाची टक्केवारी कमी होत असते, असेच काहीसे आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या बाबतीतही पाहायला मिळते आहे. झहीर खान आणि मोहम्मद शमी हे दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे संघाची गोलंदाजीचा धार दिसत नाही.
३६ वर्षीय झहीर अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही, त्याचबरोबर त्याने गेल्या मे महिन्यापासून सामन्यांमध्ये एकही चेंडू गोलंदाजी केलेली नाही. दुसरीकडे मोहम्मद शमीच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो यामधून अजूनही सावरलेला नाही.
‘‘झहीर अजूनपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. पण येत्या काही दिवसांमध्ये तो संघाबरोबर दिसेल. जोपर्यंत त्याच्या तंदुरुस्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत त्याला सरावही करता येणार नाही. शमीच्या गुडघ्याला छोटी दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो दुखापतीतून सावरत असून येत्या काही दिवसांमध्ये तो संघाच्या सेवेत रुजू होईल, अशी आम्हाला आशा आहे,’’ असे दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या पत्रकात म्हटले आहे.