गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा करून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने सर्वांना चकित केले. तेव्हापासून तो आपल्या कुटूंबासह यूकेमध्ये राहत आहे. त्याने आगामी काळात आयपीएलमध्ये खेळण्यासंबंधी प्रतिक्रिया दिली. ब्रिटनचे नागरिकत्व मिळवून आयपीएलमध्ये भाग घेता येईल असे आमिरने सांगितले.

एका मुलाखतीत मोहम्मद आमिरने आयपीएल खेळण्याविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी सध्या यूकेमध्ये राहण्यासाठी अनिश्चित कालावधीच्या रजेवर आहे. मी माझ्या क्रिकेटचा आनंद लुटत असून पुढील ६ ते ७ वर्ष खेळण्याची योजना आहे. पुढच्या गोष्टी कशा होतील, ते पाहू. माझी मुले इंग्लंडमध्ये मोठी होतील आणि शिक्षण इथेच पूर्ण करतील. त्यामुळे मी बराच काळ येथे राहीन यात शंका नाही.”

पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. केवळ पहिल्या सत्रात पाकिस्तानच्या खेळाडूंनी भाग घेतला. त्यानंतर केवळ अझर महमूदला आयपीएलचा करार मिळवण्यात यश आले. याचे कारण म्हणजे त्याने आपला ब्रिटिश पासपोर्ट वापरला होता आणि इंग्लंडचा खेळाडू म्हणून स्वत: ची नोंद केली होती. तो पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला.

सध्या अशी कोणतीही योजना त्याच्याकडे नसल्याचे मोहम्मद आमिरने सांगितले. तो म्हणाला, “मी अद्याप इतर शक्यतांचा विचार केला नाही. भविष्यात मला ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यावर गोष्टी कशा घडतील ते मला पाहावे लागेल.”