हसी के हंगामे !

* पंजाबवर १० विकेट्सने दणदणीत विजय * हसीची तडाखेबंद नाबाद ८६ धावांची खेळी * मुरलीचे नाबाद अर्धशतक * ड्वेन ब्राव्होचे तीन बळी वयाला कसलेच बंधन नसते, हे ३७ वर्षीय माइक हसीने पुन्हा एकदा दाखवून दिले. विजयासाठी १३९ धावांचे आव्हान समोर असताना दणकेबाज नाबाद ८६ धावांची खेळी साकारत त्याने चेन्नई सुपर किंग्जला १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

*  पंजाबवर १० विकेट्सने दणदणीत विजय
*  हसीची तडाखेबंद नाबाद ८६ धावांची खेळी
*  मुरलीचे नाबाद अर्धशतक
*  ड्वेन ब्राव्होचे तीन बळी
वयाला कसलेच बंधन नसते, हे ३७ वर्षीय माइक हसीने पुन्हा एकदा दाखवून दिले. विजयासाठी १३९ धावांचे आव्हान समोर असताना दणकेबाज नाबाद ८६ धावांची खेळी साकारत त्याने चेन्नई सुपर किंग्जला १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. हसीने मुरली विजयबरोबर १३९ धावांची तडाखेबंद सलामी देत तब्बल १० विकेट्स राखून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला चेन्नईने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर १३८ धावांवर रोखले. हसीलाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पंजाबच्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या माइक आणि मुरली या दोन्ही सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश केला. कोणतेही दडपण न घेता त्यांनी पंजाबच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचे काम चोख बजावले. मुरली विजय सावधपणे खेळत असला तरी माइकने पंजाबच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला.
माइकने यावेळी ५४ चेंडूंत तब्बल ११ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ८६ धावांची अफलातून खेळी साकारली, तर मुरलीने यावेळी ५० चेंडूंत ३ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ५० धावा केल्या. या दोघांच्या अभेद्य १३९ धावांच्या सलामीच्या जोरावर चेन्नईने सहजपणे सामन्यावर कब्जा केला.
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीस पाचारण करण्याचा योग्य निर्णय घेतला. डर्क नॅनेसने कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट (९) आणि मनदीप सिंग (९) या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडत संघाला चांगली सुरुवात करून दिली. २ बाद २० अशी अवस्था असताना डेव्हिडने संघाला सावरण्याचे काम बजावले. ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने सर्वाधिक ४१ धावा फटकावल्या. या वेळी डेव्हिडला गुरक्रीत सिंगने (३१) चांगली साथ दिली.
या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. पण डेव्हिड बाद झाला आणि पंजाबचा डाव पुन्हा एकदा कोसळला. डेव्हिड बाद झाल्यावर पंजाबने ३२ धावांत तब्बल ६ फलंदाज गमावले. ब्राव्होने या वेळी तीन, तर नॅनेस आणि ख्रिस मॉरीस यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : १९.५ षटकांत सर्व बाद १३८ (डेव्हिड हसी ४१, गुरक्रीत सिंग ३१, ड्वेन ब्राव्हो ३/२९) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज १७.२ षटकांत बिन बाद १३९ (माइक हसी नाबाद ८६, मुरली विजय नाबाद ५०), सामनावीर : माइक हसी.
ब्रेट ली, कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज
माइक हसी फॉर्ममध्ये आला आहे. ऑस्ट्रेलियन संघ त्याच्या या फॉर्मच्या आधारे विजयपथावर परतू शकते!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy win of chennai super kings against kings elevan punjab