IPL 2018 – एबी डिव्हीलियर्सच्या तिसऱ्या मुलाचं भारतीय नाव ऐकलं का?

कोहली, धोनी यांच्याइतकेच डिव्हीलियर्सचेही असंख्य भारतीय चाहते आहेत. डिव्हीलियर्सचे देखील भारतीयांवर आणि भारतीय संस्कृतीवर खूप प्रेम आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील बंगळुरूच्या संघाचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्स सध्या चांगल्या लयीत आहे. आयपीएलच्या सर्व ११ हंगामात डिव्हीलियर्स खेळला आहे. त्यामुळे त्याला येथील खेळपट्टीचा चांगलाच अंदाज आहे. तो आफ्रिकेत जितका लोकप्रिय आहे, तितकाच भारतातही लोकप्रिय आहे. कोहली, धोनी यांच्याइतकेचे डिव्हीलियर्सचेही असंख्य भारतीय चाहते आहेत.

महत्वाचे म्हणजे फक्त भारतीय चाहत्यांचेच डिव्हीलियर्सवर प्रेम आहे असे नाही, तर डिव्हीलियर्सचे देखील भारतीयांवर आणि भारतीय संस्कृतीवर खूप प्रेम आहे. जगातील आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालनेही नुकतीच डिव्हीलियर्सला भुरळ घातली आहे. ताज महालाचे सौंदर्य, त्यातील कलाकुसर हे त्याच्या मनाला इतके भावले आहे की डिव्हीलियर्सने त्याच्या तिसऱ्या अपत्याचे नाव याच ताज महालाच्या नावावरून ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

२०१२ साली डिव्हीलियर्सने त्याच्या प्रेयसीला ताज महालासमोर मागणी घातली होती. त्यामुळे ताज महालाचे त्याच्या जीवनात एक विशेष स्थान आहे. २०१५ साली त्यांना पहिले अपत्य झाले. त्यावेळी त्याचेही नाव अब्राहम डि व्हीलियर्स असे ठेवण्यात आले. २०१७ साली त्यांना दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव जॉन रिचर्ड ठेवले.

एका मुलाखतीदरम्यान डिव्हीलियर्स म्हणाला की जर मला तिसरे अपत्य झाले, तर मी त्या अपत्याचे नाव ‘ताज’ असे ठेवेन. माझा सहकारी जॉन्टी ऱ्होड्स यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे. मी माझ्या तिसऱ्या अपत्यासाठी आधी ‘कर्नाटक’ या नावाचा विचार करत होतो. मात्र मुलाला ‘ताज’ हे नाव जास्त शोभून दिसेल, असे त्याने स्पष्ट केले.

माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने आपल्या अपत्याचे नाव भारताच्या नावावरून ‘इंडिया’ असे ठेवले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ab de villiers wants to name his 3rd child on taj mahal

ताज्या बातम्या