आयपीएलच्या या हंगामातील उत्कंठावर्धक सामन्यांपैकी एक सामना बुधवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबदरम्यान खेळला गेला. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेला हा सामना अखेर मुंबई इंडियन्सने जिंकला. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्या आणि पंजाबचा खेळाडू के एल राहुलने खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. दोघांनीही एकमेकाची जर्सी घालत आदर व्यक्त केला. त्यांच्या या खिलाडूवृत्तीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

यासंबंधी बोलताना के एल राहुलने सांगितलं की, “फुटबॉल सामन्यात नेहमी अशाप्रकारे जर्सी बदलली जाते. मी आणि हार्दिक खूप चांगले मित्र आहोत. ही परंपरा क्रिकेटमध्येही आणावी असा विचार आम्ही केला. आम्हाला एकमेकांची जर्सी घालायची होती. जर्सी बदलल्यानंतर आम्हालाही चांगलं वाटत होतं”. पुढे बोलताना त्याने ही मैत्री मैदानात उतरल्यानंतर मात्र मर्यादित असते. त्यांना आमची विकेट हवी असते आणि आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या असतात असं त्याने सांगितलं.

मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आयपीएलच्या ११ व्या सत्रातील ५० वा सामना खेळण्यात आला. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं होतं. पंजाबचा कर्णधार अश्विनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने स्फोटक सुरुवात केली होती. पंजाबसमोर विजयासाठी १८७ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं.

अ‍ॅण्डय़्रू टायच्या भेदक माऱ्यानंतर लोकेश राहुल आणि आरोन फिंच यांनी साकारलेल्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब विजय मिळवेल असे चित्र होते. मात्र, १९व्या षटकात राहुल बाद होऊन माघारी परतला आणि पंजाबच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास मुंबईने हिस्कावला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत मुंबईने ३ धावांनी विजय मिळवला.