रंगतदार सामन्यात पांड्या बंधू चमकले, मुंबईची कोलकात्यावर १३ धावांनी मात; स्पर्धेतलं आव्हान कायम

कृणाल पांड्याने टाकलं सामन्यातलं अखेरचं षटक, हार्दिकचे सामन्यात २ बळी

कोलकात्याच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना हार्दिक पांड्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर १३ धावांनी मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलेलं आहे. मुंबईने दिलेलं १८२ धावांचं आव्हान कोलकात्याला पेलवलं नाही, अर्धशतकवीर रॉबिन उथप्पा माघारी परतल्यानंतर कोलकात्याचा संघ सामन्यात पुनरागमन करु शकला नाही. मुंबईच्या गोलंदाजांनीही सामन्याच्या उत्तरार्धात टिच्चून मारा करत कोलकात्याला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. कोलकात्यावरील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे, मात्र प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवायचा असल्यास यापुढचे चारही सामने जिंकण मुंबईला गरजेचं आहे.

मुंबईच्या विजयात पांड्या बंधूंनी महत्वाची भूमिका बजावली. फलंदाजीत मधल्या फळीत मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करुन संघाच्या धावसंख्येत भर घातल्यानंतर, गोलंदाजीतही दोन्ही भावांनी चोख कामगिरी केली. हार्दिकने सामन्यात कोलकात्याच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर दुसरीकडे कृणाल पांड्याने सामन्यातलं शेवटचं षटक टाकून मुंबईचा विजय सुनिश्चीत केला. इतर गोलंदाजांनीही हार्दिक पांड्याला चांगली साथ दिली.

त्याआधी सूर्यकुमार यादव आणि एविन लुईस यांनी केलेल्या आक्रमक सुरुवातीनंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे मुंबईला कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांच्या पट्ट्यात चेंडू देत त्यांना धावा करण्याची संधी दिली. याचा फायदा घेत सूर्यकुमार आणि लुईस जोडीने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. या दोघांत पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी झाली..मात्र लुईस माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने मुंबईचे फलंदाज माघारी परतत राहिले. मधल्या  फळीत हार्दिक-कृणाल पांड्या, ड्युमिनी  यांनी हाणामारी करत संघाला २०० चा टप्पा गाठून देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोलकात्याच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे मुंबईला १८१ धावांवर समाधान मानावं लागलं.

पहिल्या टप्प्यात कोलकात्याच्या बहुतांश सर्वच गोलंदाजांना मुंबईकर फलंदाजांच्या फटकेबाजीचा सामना करावा लागला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना चांगली वेसण घातली. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने दोन षटकांत १२ धावां देत २ बळी घेतले..त्याला सुनील नरीननेही २ बळी घेत चांगली साथ दिली.

 • कोलकात्यावर १३ धावांनी मात करत मुंबईचं स्पर्धेतलं आव्हान कायम
 • दिनेश कार्तिककडून फटकेबाजीचा प्रयत्न व्यर्थ, मुंबईचा सामन्यात थरारक विजय
 • कृणाल पांड्याच्या अखेरच्या षटकात नरीन माघारी, कोलकात्याचा सहावा गडी माघारी
 • १९ व्या षटकात दिनेश कार्तिकची फटकेबाजी, ड्युमिनीने सोडला कार्तिकचा सोपा झेल
 • बुमराहच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेल माघारी, कोलकात्याचा निम्मा संघ माघारी
 • दिनेश कार्तिक-आंद्रे रसेल जोडीकडून कोलकात्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • आखुड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना राणा माघारी, कोलकात्याचा चौथा गडी माघारी
 • पाठोपाठ हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर नितीश राणा माघारी
 • मयांक मार्कंडेच्या गोलंदाजीवर उथप्पा माघारी, कोलकात्याची जमलेली जोडी फुटली
 • बेन कटींगच्या गोलंदाजीवर सलग ४ चौकार ठोकत रॉबिन उथप्पाचं अर्धशतक
 • मार्कंडेने सोडलेला झेल मुंबईसाठी धोकादायक, कोलकात्याने ओलांडला १०० धावांचा टप्पा
 • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
 • रॉबिन उथप्पा-नितीश राणा जोडीने कोलकात्याचा डाव सावरला
 • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर मयांक मार्केंडेने सोडला उथप्पाचा सोपा झेल
 • पाठोपाठ हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर शुभमन गिल माघारी, कोलकात्याला दुसरा धक्का
 • अखेर ख्रिल लीन माघारी, कोलकात्याला पहिला धक्का. मॅक्लेनघनने घेतला बळी
 • मिचेल मॅक्लेनघनच्या गोलंदाजीवर  ३ खणखणीत चौकार
 • ख्रिस लीन-शुभमन गिलची सुरुवातीच्या षटकांमध्येच फटकेबाजी
 • कोलकात्याकडून डावाची आक्रमक सुरुवात
 • कोलकात्याला विजयासाठी १८२ धावांचं आव्हान
 • २० षटकांत मुंबईची ४ गड्यांच्या मोबदल्यात १८१ धावांपर्यंत मजल
 • अखेरच्या षटकांमध्ये कोलकात्याच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा, मुंबईची धावगती मंदावली
 • मुंबईचा चौथा गडी माघारी
 • नरीनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात कृणाल पांड्या माघारी
 • पांड्या बंधूंची मैदानात फटकेबाजी, मुंबईने ओलांडला १५० धावांचा टप्पा
 • ३९ चेंडूत सूर्यकुमारची ५९ धावांची खेळी, ७ चौकार व २ षटकारांचा समावेश
 • सूर्यकुमार यादवला माघारी धाडण्यात कोलकात्याला यश, मुंबईला तिसरा धक्का
 • हार्दिक पांड्याकडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न
 • सुनिल नरीनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित माघारी, मुंबईला दुसरा धक्का
 • रोहित शर्माकडूनही आक्रमक सुरुवात, संघाचा डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न
 • मुंबईला पहिला धक्का, एविन लुईस माघारी
 • मुंबईची १०० धावसंख्येकडे वाटचाल, पहिल्या विकेटसाठी सूर्यकुमार-लुईसमध्ये ९१ धावांची भागीदारी
 • मुंबईची सलामीची जोडी फोडण्यास कोलकात्याचे गोलंदाज अपयशी
 • मुंबईने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
 • दुसऱ्या बाजूने एविन लुईसही आला फॉर्मात, मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी
 • सूर्यकुमार यादवचं कोलकात्याच्या गोलंदाजांवर आक्रमण
 • मुंबईच्या सलामीवीरांकडून डावाची आक्रमक सुरुवात
 • घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात कोणताही बदल नाही
 • कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2018 mi vs kkr live updates