मुंबईसाठी प्लेऑफचा रस्ता खडतर, राजस्थान ७ गडी राखून विजयी

या पराभवामुळे मुंबईचे बाद फेरीचे गणित बिघडले

सलामीवीर जोस बटलरच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सचा ७ विकेट राखून पराभव केला. या पराभवामुळे मुंबईचे बाद फेरीचे गणित बिघडले असून राजस्थान मात्र या शर्यतीत अजूनही टिकून आहे. मुंबईने दिलेले १६९ धावांचे आव्हान राजस्थानने १८ षटकांत पूर्ण केले.

राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डार्सी शॉट अवघ्या ९ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर, बटलर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. रहाणे ३७ धावांवर बाद झाल्यानंतरही बटलरने एक बाजू लावून धरत आपल्या संघाला विजयी केले. त्याने ५३ चेंडूत ९ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९४ धावा केल्या. संजू सॅम्सनने त्याला १४ चेंडूंत २६ धावा करून चांगली साथ दिली. हार्दिक पंडय़ाने दोन गडी बाद केले.

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने एविन लेविस (६० धावा) आणि हार्दिक पंडय़ाच्या (३६) उपयुक्त खेळीमुळे सन्मानजनक धावसंख्या उभारली. लेविसने सूर्यकुमार यादवसोबत (३८) पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. मात्र, यादव व रोहित शर्मा सलग चेंडूंवर बाद झाल्याने मुंबईचा संघ अडचणीत सापडला. अखेरच्या षटकांत धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात मुंबईने सातत्याने बळी गमावले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १६८ (एविन लेविस ६०, हार्दिक पंडय़ा ३६; जोफ्रा आर्चर २/१६) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १८ षटकांत ३ बाद १७१ (जोस बटलर ९४*, अजिंक्य रहाणे ३७; हार्दिक पंडय़ा २/५२).

सामनावीर : जोस बटलर

 • पहिल्याच षटकात राजस्थानला धक्का, ़डार्सी शॉर्ट बुमराहच्या गोलंदाजीवर माघारी
 • २० षटकांत मुंबईची १६८ धावांपर्यंत मजल, राजस्थानला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान
 • अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना हार्दिक पांड्या माघारी, मुंबईचा सहावा गडी माघारी
 • हार्दिक पांड्या माघारी, मुंबईचा पाचवा गडी माघारी
 • ठराविक अंतराने कृणाल पांड्या तंबूत परतला, मुंबईचा चौथा गडी माघारी
 • धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर लुईस माघारी, मुंबईला तिसरा धक्का
 • एविन लुईसचं अर्धशतक, मुंबईने ओलांडला शंभर धावांचा टप्पा
 • लागोपाठच्या चेंडूवर रोहित शर्मा माघारी, मुंबईला दुसरा धक्का
 • जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मुंबईचा पहिला गडी माघारी
 • अखेर मुंबईची जमलेली जोडी फुटली, सूर्यकुमार यादव माघारी
 • मुंबईची आक्रमक सुरुवात
 • ५० व्या षटकात मुंबईने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
 • राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांचं गचाळ क्षेत्ररक्षण, मुंबईच्या सलामीवीरांचे ३ झेल सोडले
 • सूर्यकुमार यादव-एविन लुईस जोडीची आक्रमक सुरुवात
 • राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2018 mi vs rr live updates