राजस्थान रॉयल्स संघाचा मार्गदर्शक शेन वॉर्न सध्या संजू सॅमसनच्या फलंदाजीने चांगलाच प्रभावित झालेला आहे. संजू सॅमसनची फलंदाजी पाहता, भारतीय क्रिकेटमधलं त्याचं भविष्य उज्वल असल्याचं शेन वॉर्नने म्हटलं आहे. संजू सॅमसनने आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये ३७९ धावा केल्या आहेत.

अवश्य वाचा – मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेला ठोठावला १२ लाख रुपये दंड

“फिरकी आणि जलदगती गोलंदाजीविरोधात संजू चांगली फलंदाजी करतो. त्याची शैलीही वाखणण्याजोगी आहे. त्याचा खेळ पाहता आगामी काळात तो भारतीय क्रिकेटचा उगवता तारा ठरणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये.” आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शेन वॉर्नने सॅमसनच्या खेळाचं कौतुक केलंय.

सध्याच्या घडीला गुणतालिकेत राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावर आहे. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात राजस्थानने विजय मिळवत प्ले-ऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी आणखीन प्रबळ केली आहे. याचसोबत आगामी काळात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यास ते आपला ठसा उमटवतील असंही वॉर्न म्हणाला आहे. त्यामुळे आगामी काळात संजू सॅमसनच्या खेळीकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.