आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी जानेवारी महिन्यात लिलाव पार पडला. त्यावेळी ख्रिस गेल नावाच्या वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज फलंदाजावर बोली लावायला कुठलाही संघ मालक तयार नव्हता. वय, फिटनेस आणि फॉर्म या तीन गोष्टी गेलच्या विरोधात जात होत्या. खेळात सातत्याचा अभाव असल्यामुळे कुठलाही संघ ख्रिस गेलवर पैसे मोजायला तयार नव्हता. दोन दिवस चाललेल्या या लिलावात पहिल्या दिवशी शनिवारी कोणीही गेलवर बोली लावण्यात स्वारस्य दाखवले नाही.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारच्या सकाळच्या सत्रातही गेलचे नाव पुकारले गेले पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे क्रिकेटच्या ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारावर अधिराज्य गाजवणाऱ्या या फलंदाजाचा आयपीएलमधला प्रवास आता इथेच थांबणार असे सर्वांना वाटले. त्यानंतर शेवटचा एक चान्स घ्यायचा म्हणून पुन्हा एकदा ख्रिस गेलचे नाव पुकारले गेले. त्यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालक प्रिती झिंटा आणि मार्गदर्शक विरेंद्र सेहवागने चर्चा करुन हात उंचावला व गेलला त्याच्या बेस प्राईसला म्हणजे फक्त २ कोटी रुपयांना विकत घेतले.

आज हाच निर्णय पंजाबच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. ज्या खेळाडूला बेस प्राईसला विकत घेतले जाते त्याच्याकडून मोठया अपेक्षा बाळगल्या जात नाहीत. त्यामुळेच सेहवागने ख्रिस गेलने आम्हाला दोन सामने जरी जिंकून दिले तरी आमचे पैसे वसूल झाले आम्ही समजू असे म्हटले होते. मागच्या दोन सामन्यात ख्रिस गेलने आपल्या बॅटचा जो तडाखा दाखवलाय तो पाहता यापुढच्या प्रत्येक सामन्यात पंजाबला सर्वाधिक अपेक्षा त्याच्याकडूनच असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गेलची खेळण्याची शैली पाहिली तर मैदानावर शेवटपर्यंत टिकून राहण्यापेक्षा आक्रमक फटकेबाजी करुन वेगाने धावा जमवण्यावर त्याचा भर असतो. यामुळे अनेकदा तो लवकर बादही होतो. पण यावेळी गेल जास्तीत जास्त खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. आजच्या सामन्यात गेल शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर उभा होता.

याआधी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने ३३ चेंडूत ६३ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये यात सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. आजच्या सामन्यात त्याने ६३ चेंडूत १०४ धावा तडकावताना ११ षटकार आणि १ चौकार लगावला. म्हणजे चौकार-षटकारातूनच त्याने ७० धावा केल्या. यापुढच्या सामन्यात गेलने २० षटके खेळून काढण्याच्याच निर्धाराने फलंदाजी केली तर प्रतिस्पर्धी संघांचे टेन्शन नक्कीच वाढेल.