ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये १४० अत्यंत माफक लक्ष्य आहे. पण इतक्या कमी धावसंख्येचा पाठलाग करतानाही चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. चेन्नईच्या विजयात फाफ डुप्लेसिसबरोबर महत्वाची भूमिका बजावली ती मुंबईकर शार्दुल ठाकूरने. मोक्याच्या क्षणी शार्दुलने खेळ उंचावत पाच चेंडूत नाबाद १५ धावा केल्या. यात तीन चौकार होते. सिद्धार्थ कौलच्या १९ व्या षटकात शार्दुलने तीन चौकार लगावून सामन्याचा नूरच पालटून टाकला.

शार्दुलच्या या खेळीमुळे शेवटच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज होती. त्यावेळी स्ट्राईकला असलेल्या डुप्लेसिसने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून चेन्नईला आयपीएलच्या अकराव्या सीझनच्या अंतिम फेरीत पोहोचवले. शार्दुल ठाकूर या सामन्यात सुदैवी ठरला. कारण काही कारणाने चेन्नईचा पराभव झाला असता तर त्यासाठी सर्वाधिक दोष शार्दुलचा दिला गेला असता. कारण चेन्नईच्या अन्य गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. पण शार्दुलने चार षटकात एक विकेटच्या मोबदल्यात ५० धावा दिल्या.

प्लेऑफच्या या महत्वाच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने सातच्या सरासरीने धावा केल्या तर शार्दुलच्या चार षटकात १२.५ च्या सरासरीने धावा वसूल केल्या. वानखेडे हे शार्दुलच घरच मैदान असून तो फलंदाजीला उतरल्यानंतर नशीब पालटलं. शार्दुल फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा सीएसकेला विजयासाठी १३ चेंडूत २७ धावांची आवश्यकता होती. त्याने सिद्धार्थ कौलच्या १९ व्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर चौकार ठोकून समोरच्या टोकाला उभ्या असलेल्या डुप्लेसिसला चिंतामुक्त केले. एकूणच या सामन्यात शार्दुल खलनायक बनता बनता नायक बनला असेच वर्णन करावे लागेल.