क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने रविवारच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद ६९ धावांची खेळी केली, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान परत मिळवले. या सामन्यात एक अतिशय मजेशीर गोष्ट घडली.

मुंबईच्या डावात ११व्या षटकात रबाडा गोलंदाजीसाठी आला. दिल्लीला विकेटची आणि मुंबईला धावांची खूप नितांत गरज होती. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने खेळला. इशान किशन धावत अगदी सूर्य़कुमारपर्यंत आलाच होता, पण शेवटच्या क्षणी अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे तो बाद होण्यापासून वाचला. इशान आणि सूर्यकुमार दोघेही स्ट्राईकच्या दिशेने धावत असताना नॉन-स्ट्राईकला चेंडू फेकला असता, तर एक फलंदाज नक्की बाद होऊ शकला असता. पण रहाणेने थ्रो स्ट्राइकच्या दिशेने फेकला आणि या गोंधळात इशान किशन पुन्हा सुरक्षित नॉन स्ट्राईकच्या क्रीजमध्ये पोहोचला.

पाहा तो मजेशीर व्हिडीओ-

असा रंगला सामना

नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणे १५ धावांवर बाद झाला. कर्णधार अय्यर ३३ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. पण सलामीवीर शिखर धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५२ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्यामुळे दिल्लीने १६२ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संयमी सुरूवात केली. सलामीवीर क्विंटन डी कॉकने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत ३६ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी करत ३२ चेंडूत ५३ धावा केल्या. त्यानंतर सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला असताना कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी मोक्याच्या क्षणी धावा काढत संघाला विजय मिळवून दिला.