IPL 2020 DC vs KXIP: सलामीच्या सामन्यात मुंबईच्या संघाला चेन्नईने पराभूत केले. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या दोन अनुभवी कर्णधारांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. पण दुसऱ्या सामन्यात मात्र दोन नव्या दमाच्या कर्णधारांमधील लढत चाहत्यांना अनुभवायला मिळाली. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यातील सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या काही षटकांमध्ये त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. या दरम्यान, मैदानावर काहीसा गोंधळ पाहायला मिळाला.

दिल्लीच्या संघाकडून अनुभवी शिखर धवन आणि नवखा पृथ्वी शॉ हे दोघे सलामीला आले. मोहम्मद शमीने दुसऱ्याच षटकात एक बाऊन्सर चेंडू टाकला. तो चेंडू धवनच्या ग्लोव्ह्जला लागून किपर राहुलच्या दिशेने गेला. राहुलला चेंडू झेलता आला नाही. त्याच्या हाताला लागून चेंडू बाजूला उडाला. हीच चोरटी धाव घेण्याची संधी आहे असं मानून धवन धाव घेण्यासाठी निघाला, पण मैदानावर त्याच्यात आणि शॉ मध्ये झालेल्या गोंधळामध्ये अखेर धवन धावचीत झाला.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांनी अद्याप एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवलेलं नाही. परंतु यंदाचा संपूर्ण हंगाम हा युएईत होणार असल्यामुळे प्रत्येक संघाला विजयाची समान संधी असल्याचं मानलं जातंय. दिल्लीने आपल्या संघात अपेक्षेप्रमाणे अजिंक्य रहाणेला स्थान दिलं नाही. तसेच अमित मिश्रालाही संघाबाहेर ठेवण्यात आलं. अष्टपैलू स्टॉयनिसला मात्र संघात जागा मिळाली. तसेच इशांतच्या अनुपस्थितीत नॉर्टजे आणि रबाडा या वेगवान माऱ्याला संधी मिळाली. दुसरीकडे पंजाबने अनुभवी आणि तरुण खेळाडूंना समान संधी देण्याचा प्रयत्न केला.