Dream11 IPL 2020 UAE : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला दमदार सुरूवात मिळवून देणारा क्विंटन डी कॉक कोलकाताच्या शिवम मावीचा पहिला बळी ठरला. दुसऱ्याच षटकात तो १ धाव काढून माघारी परतला. पण सूर्यकुमार यादवने तुफानी सुरूवात केली. संदीप वारियरच्या गोलंदाजीवर त्याने धुलाई केली.

दुसऱ्या षटकात डी कॉक बाद झाल्यामुळे मुंबई शांत आणि संयमी खेळ करेल अशी कोलकाताला अपेक्षा होती पण मुंबईने हल्लाबोल केला. संदीप वारियर तिसरे षटक टाकण्यासाठी आला. सूर्यकुमार यादवने संदीप वारियच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर त्याने चौकार लगावल्यावर दोन चेंडू निर्धाव गेले. पण त्यानंतर चौकारांची हॅटट्रिक करत सूर्यकुमारने षटक संपवलं.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, मुंबईसाठी आणखी एक आनंदाची गोष्टही घडली. कायरन पोलार्डने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात खेळत असलेल्या सामन्यात १५०व्यांदा मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. मुंबईच्या संघाकडून १५० सामने खेळणारा पोलार्ड हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. २०१० साली १० मे ला पोलार्डने मुंबई इंडियन्स संघातून IPL मध्ये पदार्पण केले. चॅम्पियन्स लीग टी २० स्पर्धेत पोलार्डने त्रिनिदाद आणि तोबॅगो संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती. त्यानंतर त्याला मुंबईने संघात स्थान दिले होते.