आयपीएल म्हणजे रंगत हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. दुबईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली आहे. विजयासाठी अवघ्या ३ धावांचं आव्हान मिळालेल्या दिल्लीने आपलं लक्ष्य सहज पूर्ण करत संघर्षपूर्ण लढतीत विजय संपादन केला. निर्धारित वेळेत पंजाबकडून धडाकेबाज खेळी करणाऱ्या मयांक अग्रवालला सुपरओव्हरमध्ये संधी न दिल्यामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कगिसो रबाडाने सुपरओव्हरमध्ये अवघ्या २ धावा देत २ बळी घेतले. ऋषभ पंतने विजयासाठी दिलेलं आव्हान सहज पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, दुबईच्या मैदानावर रंगलेला सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने भेदक मारा करत पंजाबला १५७ धावांत रोखलं. मयांक अग्रवालने ८९ धावांची बहारदार खेळी करत पंजाबला विजयाच् जवळ आणलं. परंतू स्टॉयनिसने अखेरच्या षटकात दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं आणि सामना बरोबरीत सुटला. स्टॉयनिसने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानता आपल्या संघाचं आव्हान कायम राखलं. पंजाबकडून मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केल्यामुळे मधल्या षटकांमध्ये आवश्यक गतीने धावा झाल्या नाहीत. दिल्लीकडून पहिल्या डावात रबाडा-आश्विन आणि स्टॉयनिस या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ बळी घेतले. मोहीत शर्मा आणि अक्षर पटेलने १-१ बळी घेतला.

त्याआधी, मोहम्मद शमी आणि पंजाबच्या इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची गाडी रुळावरुन घसरली. २० षटकांत दिल्लीचा संघ १५७ धावांपर्यंत मजल मारु शकला. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी दिल्लीला चांगलीच महागात पडली. परंतू अखेरच्या षटकांत स्टॉयनिसने फटकेबाजी करुन सर्व कसर भरून काढली. स्टॉयनिसने २१ चेंडूत ५३ धावांची खेळी करुन दिल्लीचा डाव सावरला.

नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. चोरटी धाव घेण्याच्या नादात सलामीवीर शिखर धवन एकही धाव न काढता माघारी परतला. यानंतर पृथ्वी शॉ देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. हेटमायरला बाद करुन मोहम्मद शमीने दिल्लीची अवस्था अधिक बिकट केली. ३ बाद १३ अशी परिस्थिती असताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी ७३ धावांची भागीदारी केली. रवि बिश्नोईने पंतला माघारी धाडत पुन्हा एकदा दिल्लीला धक्का दिला. पंतने ३१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करणारा कर्णधार श्रेयस अय्यरही मोठी फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. मोहम्मद शमीने ३९ धावांवर त्याला माघारी धाडलं. अखेरच्या षटकांत अष्टपैलू स्टॉयनिसने फटकेबाजी करत दिल्लीला १५७ धावांचा टप्पा गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमीने ३, शेल्डन कोट्रेलने २ तर रवी बिश्नोईने १ बळी घेतला.