“मॅन ऑफ द मॅच पुरस्कार चुकीच्या व्यक्तीला दिला, माझ्या मते…”, सेहवागने व्यक्त केली नाराजी

सेहवागने सामन्यातील एक फोटोही केला आहे शेअर

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना, विजयासाठी शेवटच्या षटकांत हव्या असलेल्या धावा, फलंदाजांनी फटकेबाजी असा उत्कंठावर्धक माहोल प्रेक्षकांना आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात पहायला मिळाला आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात, दिल्लीने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली. पंजाबला विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिलेलं असताना, दिल्लीने अखेरच्या षटकांत सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल सुपरओव्हरवर गेला. आयपीएलच्या इतिहासातली ही दहावी सुपरओव्हर ठरली. कगिसो रबाडाने भेदक मारा करत पंजाबच्या दोन फलंदाजांना माघारी धाडत अवघ्या २ धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा सहज पूर्ण करत दिल्लीने सामन्यात बाजी मारली. या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवल्यानंतर मार्कस स्टॉयनीसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सामन्याच्या पंचांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा, असा उपरोधक टोला ट्विटवरुन लगावला आहे.

कोणत्या निर्णयावर संतापला सेहवाग?

पंजाब धावांचा पाठलाग करत असताना १८ व्या षटकात क्रिस जॉर्डनने काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव पंचांनी शॉर्ट रन म्हणजे फलंदाजाने बॅट पूर्णपणे क्रिजमध्ये न टेकवल्याने ग्राह्य धरली जाणार नाही असं जाहीर केलं. मात्र रिप्लेमध्ये जॉर्डनने क्रिजच्या आतमध्ये बॅट टेकवल्याने दिसत होते. त्यामुळेच याच रिप्लेच्या स्क्रीनशॉर्टमधील बॅट क्रिजमध्ये टेकवल्याचा फोटो पोस्ट करत सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. “मला आजच्या समन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता. आणि याच एका धावेचा फरक नंतर पडला,” असं ट्विट सेहवागने केलं आहे.

भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारे ट्विट केलं आहे. “त्या एका शॉर्ट रनच्या निर्णयाचं काय?”, असं ट्विट करत इरफानने सुमार पंचगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

दोन माजी क्रिकेटपटूंबरोबरच अनेकांनी एवढे आधुनिक तंत्रज्ञान असूनही अशा चुका होत असल्याने सामन्याचा निकाल बदलतो यासंदर्भात बीसीसीआयने योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  या शॉर्ट रन प्रकरणामुळे दुसऱ्याच सामन्यामध्ये पंचांच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित राहिल्याचे चित्र दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 dc vs kxip the umpire who gave this short run should have been man of the match says virender sehwag scsg

Next Story
IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी रायन हॅरिसची नियुक्ती
ताज्या बातम्या