IPL 2020 : ‘विराट’सेनेचं पॅकअप, रंगतदार सामन्यात हैदराबाद ६ गडी राखून विजयी

विल्यमसनचं नाबाद अर्धशतक

आपल्या पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या RCB च्या संघाचं पुन्हा एकदा स्वप्न भंगलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने २४ धावा करत मोलाची साथ दिली.

RCB ने विजयासाठी दिलेल्या १३२ धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवातही खराब झाली. मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकात श्रीवत्स गोस्वामीला माघारी धाडलं. यानंतर मैदानात आलेल्या मनिष पांडेने आपला कर्णधार डेव्हिड वॉर्नरची उत्तम साथ देत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी RCB च्या गोलंदाजांचा सावधपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करत असल्याचं पाहून RCB चा कर्णधार विराटने सिराज आणि सैनीवर जबाबदारी सोपवली. अखेरीस मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडलं. दुसऱ्या विकेटसाठी वॉर्नरने पांडेसोबत ४१ धावांची भागीदारी केली. यानंतर हैदराबादच्या डावालाही गळती लागली.

मनिष पांडेही झॅम्पाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. त्याने २४ धावा केल्या. युवा प्रियम गर्गही फारशी चमक दाखवू शकला नाही. चहलने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत हैदराबादला आणखी एक धक्का दिला. एका बाजूला अनुभवी केन विल्यमसनने सावध खेळ करत डाव सावरला होता. जेसन होल्डरला सोबत घेऊन विल्यमसनने फटकेबाजी करत हैदराबादचा संघ सामन्यात पिछाडीवर पडणार नाही याची काळजी घेतली. RCB च्या गोलंदाजांनीही हैदराबादच्या फलंदाजांना चांगली टक्कर देत शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी १८ धावांचं आव्हान दिलं. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावा हव्या असताना होल्डरने दोन चौकार लगावत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने २ तर झॅम्पा आणि चहलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, जेसन होल्डर, टी. नटराजन आणि इतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे करो या मरो च्या सामन्यात RCB चा संघ फक्त १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला. साखळी फेरीत सलग ४ पराभव पदरात पडलेल्या RCB च्या संघाची निराशाजनक कामगिरी या सामन्यातही कायम राहिली. एबी डिव्हीलियर्सचा अपवाद वगळता RCB चा एकही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. डिव्हीलियर्सने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३, टी. नटराजनने २ तर शाहबाज नदीमने १ बळी घेतला.

नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना केल्यानंतर RCB ने संघात ४ बदल केले. इतकच नव्हे तर कर्णधार विराट कोहली स्वतःला फलंदाजीसाठी सलामीला आला. परंतू RCB चा हा प्रयोग पुरता फसला. दुसऱ्याच षटकात जेसन होल्डरने विराट कोहलीला यष्टीरक्षक श्रीवत्स गोस्वामीकरवी झेलबाद केलं, त्याने ६ धावा केल्या. महत्वाच्या षटकांत धावा होत नसल्यामुळे दबावाखाली आलेला देवदत पडीकलही लगेचच माघारी परतला. होल्डरच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गने त्याचा सुरेथ झेल घेतला. RCB चा संघ संकटात सापडलेला असताना फिंच आणि डिव्हीलियर्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. RCB ची ही जोडी मैदानावर स्थिरावतेय असं वाटत असताना शाहबाद नदीमने फिंचला आपल्या जाळ्यात अडकवत RCB ला तिसरा धक्का दिला. फिंचने ३२ धावांची खेळी केली. यानंतर त्याच षटकात मोईन अली फ्रि-हीटवर चोरटी धाव घेताना धावबाद होऊन माघारी परतला. एकीकडे डिव्हीलियर्सने संघाचा मोर्चा सांभाळात फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. सोळाव्या षटकात RCB ने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. याच षटकात चौकार लगावत डिव्हीलियर्सने आपलं अर्धशतकही झळकावलं. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात डिव्हीलियर्सची नटराजनच्या यॉर्कर चेंडूवर माघारी परतला. त्याने ५६ धावांची खेळी केली. यानंतर तळातल्या फलंदाजांनी RCB ला १३१ धावांचा टप्पा गाठून दिला.

Live Blog

23:14 (IST)06 Nov 2020
RCB चं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात

हैदराबादसमोर आता दिल्लीचं आव्हान

23:13 (IST)06 Nov 2020
विल्यमसन – होल्डची संयमी फलंदाजी, हैदराबादची बंगळुरुवर ६ गडी राखून मात

विल्यमसनचं संयमी अर्धशतक, नाबाद ५० धावांची खेळी

जेसन होल्डरने २ चौकार लगावत संघाच्या विजयावर केलं शिक्कामोर्तब

22:48 (IST)06 Nov 2020
हैदराबादकडून विल्यमसन – होल्डरची झुंज सुरुच

RCB च्या गोलंदाजांचा समाचार घेत धावसंख्या पोहचवली १०० पार

22:28 (IST)06 Nov 2020
हैदराबादच्या फलंदाजांची हाराकिरी सुरु

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गर्ग माघारी, सामन्यात रंगत कायम

22:12 (IST)06 Nov 2020
मनिष पांडे झेलबाद; हैदराबादला तिसरा धक्का

झॅम्पाच्या गोलंदाजीवर मनिष पांडे २४ धावा काढून झेलबाद झाला आणि हैदराबादला तिसरा धक्का बसला.

21:57 (IST)06 Nov 2020
कर्णधार वॉर्नर माघारी; हैदराबादला दुसरा धक्का

खेळपट्टीवर स्थिरावलेला हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने ३ चौकारांसह १७ धावा केल्या.

21:30 (IST)06 Nov 2020
हैदराबादचीही खराब सुरुवात, श्रीवत्स गोस्वामी माघारी

मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात डिव्हीलियर्सने घेतला झेल

21:12 (IST)06 Nov 2020
मोहम्मद सिराज, नवदीप सैनीची फटकेबाजी

RCB ची १३१ धावांपर्यंत मजल, हैदराबादला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान

21:00 (IST)06 Nov 2020
RCB च्या आशा संपुष्टात, एबी डिव्हीलियर्स माघारी परतला

टी. नटराजनच्या डेडली यॉर्करपुढे डिव्हीलियर्सचं लोटांगण, RCB ला सातवा धक्का

४३ चेंडूत ५ चौकारांसह डिव्हीलियर्सच्या ५६ धावा

20:55 (IST)06 Nov 2020
RCB च्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच

टी. नटराजनच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदर माघारी, RCB ला सहावा धक्का

20:48 (IST)06 Nov 2020
एबी डिव्हीलियर्सची एकाकी झुंज, झळकावलं अर्धशतक

१६ व्या षटकांत RCB ने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

एक मोर्चा सांभाळत डिव्हीलियर्सची झुंज सुरुच

20:45 (IST)06 Nov 2020
RCB ला पाचवा धक्का, शिवम दुबे माघारी परतला

डेथ ओेव्हर्समध्ये फटकेबाजी करण्याचा दुबेचा प्रयत्न

८ धावा करत जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर दुबे बाद, कर्णधार वॉर्नरने घेतला झेल

20:22 (IST)06 Nov 2020
बंगळुरुच्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच

नदीमच्या गोलंदाजीवर फ्री-हीटवर चोरटी धाव घेताना मोईन अली धावबाद

RCB चा चौथा गडी माघारी, संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर

20:18 (IST)06 Nov 2020
RCB ला तिसरा धक्का, फिंच माघारी

३० चेंडूत ३२ धावा करत फिंच माघारी, शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला

मोक्याच्या क्षणी RCB ची जमलेली जोडी फुटली

20:17 (IST)06 Nov 2020
फिंच – डिव्हीलियर्स जोडीने सावरला RCB चा डाव

९ व्या षटकानंतर हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत ओलांडला ५० धावांचा टप्पा

20:08 (IST)06 Nov 2020
पॉवरप्लेमध्ये हैदराबादचं वर्चस्व

RCB ची निराशाजनक कामगिरी

19:54 (IST)06 Nov 2020
सुरुवातीच्या षटकांत RCB ने केलेल्या खेळावर तज्ज्ञ नाराज

हर्षा भोगले म्हणतात…

19:50 (IST)06 Nov 2020
बंगळुरुला दुसरा धक्का, देवदत पडीकल माघारी

पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धावा होत नसल्यामुळे पडीकलचा फटकेबाजी करण्याचा प्रयत्न

होल्डरच्या गोलंदाजीवर फसला पडीकल, प्रियम गर्गकडे झेल देऊन परतला माघारी

19:39 (IST)06 Nov 2020
बंगळुरुला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी

जेसन होल्डरच्या आऊटस्विंग गोलंदाजीवर लेग साईडला फटका खेळताना विराट कोहली फसला

यष्टीरक्षक श्रीवत्स गोस्वामीने घेतला झेल, अवघ्या ६ धावा काढून विराट बाद

19:12 (IST)06 Nov 2020
नाणेफेक जिंकून डेव्हिड वॉर्नरचा विक्रम
19:10 (IST)06 Nov 2020
करो या मरो च्या सामन्यात RCB च्या संघात भरघोस बदल

असा आहे RCB चा अंतिम ११ जणांचा संघ…

19:09 (IST)06 Nov 2020
असा आहे हैदराबादचा अंतिम ११ जणांचा संघ
19:07 (IST)06 Nov 2020
हैदराबादने नाणेफेक जिंकली

कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 eliminator 1 abu dhabhi srh vs rcb live updates psd

Next Story
IPL 2020: सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती
ताज्या बातम्या