आयपीएलच्या तेराव्या हंगामात ऐतिहासीक शारजाच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला राजस्थानच्या वादळी खेळीचा फटका बसला. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि अखेरच्या षटकांत जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे राजस्थानने सामन्यात २१६ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुन्गिसानी एन्गिडीने टाकलेलं अखेरचं षटक चेन्नईला चांगलंच महागात पडलं.

पहिल्या दोन चेंडूंवर षटकार, यानंतर लागोपाठ दोन नो-बॉलवर षटकार, एक वाईड आणि अखेरच्या ३ चेंडूंवर एकेरी धाव अशा पद्धतीने एन्गिडीने ३० धावा दिल्या. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महाग शेवटचं षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एन्गिडीला पहिलं स्थान मिळालं आहे. याआधी अशोक दिंडा आणि ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

एन्गिडीने ४ षटकांत ५६ धावा देत १ बळी घेतला. चेन्नईच्या इतर गोलंदाजांनाही आज चांगलाच मार पडला. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर ५५ तर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर राजस्थानच्या फलंदाजांनी ४० धावा कुटल्या.