फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची सुरेख गोलंदाजी आणि त्यांना इतरांनी भेदक मारा करत दिलेली साथ या जोरावर RCB ने शारजाच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या KKR च्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. KKR चा संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवत आपला विजयरथ प्ले-ऑफच्या शर्यतीत आणला आहे. RCB कडून फलंदाजीत एबी डिव्हीलियर्सने आक्रमक अर्धशतक झळकावलं, पण संघाचे गोलंदाज हे खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले.

१९५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने सावध सुरुवात केली. संघात स्थान मिळालेल्या टॉम बँटनला गिलसोबत सलामीला संधी देण्यात आली. मात्र नवदीप सैनीने आपल्या सुरेख इनस्विंगवर बँटनचा त्रिफळा उडवत कोलकात्याला पहिला धक्का दिला. यानंतर कोलकात्याच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. नितीश राणा, शुबमन गिल, दिनेश कार्तिक, मॉर्गन, रसेल असे नावाजलेले फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. RCB कडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंनी दहाव्या षटकापर्यंत सुंदर मारा करत KKR च्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं.

KKR कडून शुबमन गिलने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली झुंज दिली. यानंतर मधल्या फळीत आंद्रे रसेलने फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू RCB च्या माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. १५ षटकं पार पडल्यानंतरही KKR चा संघ १०० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. RCB कडून वॉशिंग्टन सुंदर आणि ख्रिस मॉरिसने प्रत्येकी २ तर सैनी, सिराज, चहल आणि उदाना यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, अखेरच्या षटकांत एबी डिव्हीलियर्सची फटकेबाजी आणि सलामीला फिंच-पडीकल जोडीने करुन दिलेली भक्कम सुरुवात या जोरावर RCB ने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. डिव्हीलियर्सने झळकावलेलं धडाकेबाज अर्धशतक RCB च्या डावाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. चांगली सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये RCB च्या धावगतीवर अंकुश लावण्यात KKR च्या गोलंदाजांना यश आलं होतं. परंतू डिव्हीलियर्स आणि विराट कोहलीने मोक्याच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत RCB ला शारजाच्या मैदानावर आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला.

RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेताना दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. शारजाच्या छोट्या मैदानाचा दोन्ही फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. RCB ची ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच आंद्रे रसेलने पडीकलचा त्रिफळा उडवत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. पडीकलने ३२ धावा केल्या. यानंतर फिंच आणि विराट कोहलीने पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू फिंचला बाद करत प्रसिध कृष्णाने KKR ला दुसरं यश मिळवून दिलं.

खेळपट्टीवर स्थिरावलेले दोन फलंदाज माघारी परतल्यामुळे ऐनवेळी RCB चा संघ अडचणीत सापडला. परंतू कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांनी फटकेबाजी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संघाला धावांचा टप्पा गाठून दिला. डिव्हीलियर्सने महत्वाची भूमिका बजावत KKR च्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत डिव्हीलियर्सने संघाला मोक्याच्या षटकांमध्ये महत्वपूर्ण धावा जमवून दिल्या. डिव्हीलियर्सने नाबाद ७३ तर विराट कोहलीने नाबाद ३३ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. KKR कडून प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.