आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचं विमान दुसऱ्याच सामन्यात जमिनीवर आलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. विशेषकरुन संजू सॅमसनने चेन्नईचा फिरकीपटू पियुष चावलाला लक्ष्य करत त्याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकले.

संजू सॅमसनने १९ चेंडूत आपलं अर्धशतक साजरं केलं. पियुष चावलाच्या एका षटकात राजस्थानच्या फलंदाजांनी तब्बल २८ धावा कुटल्या. आयपीएलच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत आता पियुष चावलाला स्थान मिळालं आहे.

इतकच नव्हे तर आयपीएलमध्ये आतापर्यंत पियुष चावलाच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.

चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकर यशस्वी जैस्वालला झटपट माघारी धाडत चेन्नईने चांगली सुरुवात केली. परंतू यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली.