मुंबईच्या फलंदाजांचा विक्रम; IPLच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

मुंबईने स्पर्धेत गोलंदाजीसह फलंदाजीतही गाजवलं वर्चस्व

IPL 2020 FINAL: IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

IPL 2020 : मुंबईने विजेतेपद जिंकूनही रोहित नाराज, जाणून घ्या कारण

हंगामात दमदार फलंदाजी करताना इशान किशन, क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव या मुंबईच्या त्रिकुटाने एक विक्रम केला. एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली आणि ख्रिस गेल या त्रिकुटाने २०१५च्या केलेल्या कामगिरीशी मुंबईच्या त्रिकुटाने बरोबरी केली. संपूर्ण हंगामात इशान किशनने १४ सामन्यात ५१६ धावा कुटल्या. इशानपाठोपाठ यष्टीरक्षक सलामीवीर क्विंटन डी कॉकने ५०३ धावा केल्या. तर ‘मुंबईकर’ सूर्यकुमार यादवने १६ सामन्यात मुंबईच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळत ४८० धावा फटकावल्या. IPL इतिहासात कोणत्याही संघाच्या तीन फलंदाजांनी एका हंगामात ४७५ पेक्षा जास्त धावा काढण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. यापूर्वी अशी कामगिरी २०१५ मध्ये बंगळूरूच्या विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांनी केली होती.

IPL 2020 : पुरस्कारविजेते खेळाडू मालामाल; बघा कुणाला मिळाले किती?

आयपीएलच्या आठव्या हंगामात म्हणजेच IPL 2015मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना कर्णधार विराट कोहली याने ५०५ धावा, मधल्या फळीतील एबी डीव्हिलियर्सने ५१३ धावा तर सलामीवीर ख्रिस गेल याने ४९१ धावा केल्या होत्या. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर संघ प्ले-ऑफ्समध्ये पोहोचला होता. पण त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2020 suryakumar yadav ishan kishan de kock virat kohli ab de villiers chris gayle records vjb