IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू झाली. यंदाच्या हंगामात सर्व संघांचे जवळपास ७ सामने खेळून झालेले आहेत. दमदार कामगिरीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स असे दोन संघ गुणतालिकेत वर आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाताच्या संघांचीही कामगिरी खूपच सुधारली दिसते आहे. पण राजस्थान, पंजाब आणि चेन्नईच्या संघांना अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे काही संघ आनंदी आहेत, तर काही संघ थोडेसे दु:खात आहेत. अशा परिस्थितीत स्पर्धेतील एका संघाने बदली खेळाडू देण्याची विनंती BCCIकडे केलेली आहे.

“दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या पाठीच्या दुखापतीने ७ ऑक्टोबरच्या सराव सत्रात उचल खाल्ली. दुखापतीवर उपचार करताना दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. इशांतच्या तंदुरूस्तीसाठी सारेच प्रार्थना करत आहेत, पण त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार आहे”, असे संघ व्यवस्थापनाने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे.