सुमारे वर्षभराचा कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने ऑगस्ट महिन्यात निवृत्ती घेतली. यानंतर तो आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी झाला आहे. परंतू नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नईचा संघ यंदा गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे. आयपीएलमध्ये गेल्या काही सामन्यांपासून धोनीची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धोनीने उशीरा फलंदाजीसाठी येणं पसंत केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली. सोशल मीडियावर चेन्नईचे चाहतेही संघावर नाराज असताना, भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी धोनीच्या बचावासाठी पुढे आले आहेत.

“प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक काळ असा असतो की जिकडे ज्याची प्रगती होते तसंच एक काळ असाही असतो की जिकडे त्याचा फॉर्म हरवायला सुरुवात होते. काळाप्रमाणे गोष्टी बदलत जातात. धोनीच्या कामगिरीवरुन त्याच्यावर टीका करणाऱ्यांची मला किव करावीशी वाटते. काही काळापूर्वी धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिनीशर म्हणून ओळखला जायचा. तो एका प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर परत आलाय, त्यामुळे धोनीची यंदाची कामगिरी फारशी चांगली होत नाही. या वयात खेळाडूंमध्ये पूर्वीसारखा उत्साह राहत नाही. याव्यतिरीक्त भविष्यातील अनेक गोष्टींबद्दल प्रत्येकाला टेन्शन असतात, आपण हे स्विकारायला हवं.” किरमाणी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीच्या सामन्यात संपुष्टात आलं. यानंतर सुमारे वर्षभराचा कालावधी धोनी एकही सामना खेळलेला नाही. दरम्यानच्या काळात धोनीने भारतीय संघात पुनरागमन करावं यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांची जोरदार कँपेन केलं. परंतू धोनीने १५ ऑगस्टला संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांनंतर मी निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.