हैदराबादविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या. चेन्नईच्या डावाची सुरूवात खराब झाली होती, पण मधल्या षटकांमध्ये शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीने केलेल्या ८१ धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली. जाडेजाने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला १६०च्या पार मजल मारून दिली. हैदराबादकडून फिरकी गोलंदाजांना यश मिळाले नाही पण वेगवान गोलंदाजांनी मात्र प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत पहिल्यांदा CSKला आधी फलंदाजीची संधी मिळाली. नियमित सलामीवीर फाफ डु प्लेसिससोबत आजच्या सामन्यात सॅम करनला पाठवण्यात आलं. डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. सॅम करनने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. खलील अहमदच्या गोलंदाजीवर करनने एकाच षटकात २ चौकार आणि २ षटकार लगावले होते. पण संदीप शर्माने त्याला स्विंग गोलंदाजीची कमाल दाखवत ३१ धावांवर त्रिफळाचीत केलं.

पाहा फलंदाजालाही न कळलेला सुपर स्विंग-

त्यानंतर शेन वॉटसन आणि रायडु यांनी डाव सावरत ८१ धावांची भागीदारी केली. पण दोघांनाही अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. वॉटसन ४२ तर रायडू ४१ धावांवर माघारी परतला. धोनीने २ चौकार आणि १ षटकार खेचत थोडी चमक दाखवली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो २१ धावांवर बाद झाला. पण रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत तळ ठोकत १० चेंडूत नाबाद २५ धावा कुटल्या आणि चेन्नईला १६७ धावांपर्यंत मजल मारून दिली. हैदराबादकडून संदीप शर्मा, नटराजन आणि खलील अहमद यांना २-२ बळी मिळाले.