आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. युएईत पोहचलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे संघासमोर चिंतेचं वातावरण होतं. परंतू सर्व करोनाबाधित व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर आता संघाने सरावाला उतरण्याची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे सुरेश रैनाच्या जागी संघात कोणाला संधी मिळणार यावरुन सोशल मीडियामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र रैनाच्या मते फलंदाजीत धोनीने त्याच्या जागेवर म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला हवं.

“धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. एप्रिल २००५ मध्ये विशाखापट्टणम वन-डे सामन्यात पाकिस्तानविरुद्ध धोनीची १४८ धावांची खेळी कोणीही विसरु शकणार नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना धोनीने केलेली ती महत्वपूर्ण खेळी होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि धोनी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो.” रैना Outlook ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

परिवारातील सदस्यावर पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्याचं कारण देऊन रैनाने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. मध्यंतरी त्याच्या माघार घेण्यावरुन अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. चेन्नईचं प्रशासनही रैनावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतू संघाचे मालक एन.श्रीनीवासन यांनी आपण रैनाच्या पाठीशी असल्याचं सांगितलं होतं.

अवश्य वाचा – IPL 2020 : हरभजन सिंहची स्पर्धेतून माघार, CSK संघासमोरची चिंता वाढली