फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची सुरेख गोलंदाजी आणि त्यांना इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या जोरावर RCB ने शारजाच्या सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या KKR च्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. KKR चा संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवला.

फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या शारजाच्या मैदानात युजवेंद्र चहलने ४ षटकांत केवळ १२ धावा देत १ गडी टिपला, तर वॉशिंग्टन सुंदरने ४ षटकांत २० धावा देत २ बळी टिपले. या विजयानंतर युजवेंद्र चहलने एक ट्विट केलं. ‘एकट्याच्या शिट्टीने कधीही गाणं सुंदर होत नसतं, त्यासाठी संपूर्ण वाद्यवृंदाची गरज असते’, असं ट्विट करत चहलने सांघिक प्रयत्नांमुळेच हा विजय शक्य झाल्याचं सांगितलं. त्यावर सिक्सर किंग युवराज सिंगने मजेशीर उत्तर दिलं. ‘तू तर कोणालाच फटकेबाजी करू देत नाहीयेस. मला परत मैदानात उतरावं लागणार असं दिसतंय’, असा मजेदार रिप्लाय त्याने दिला. तसंच चहलच्या गोलंदाजीचं कौतुकदेखील केलं.

दरम्यान, RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. पडीकल-फिंच जोडी बाद झाल्यावर डीव्हिलियर्स फटकेबाजीची जबाबदारी घेतली. डिव्हीलियर्सने तडाखेबाज खेळी करत नाबाद ७३ धावा केल्या. तर विराट कोहलीने नाबाद ३३ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. टॉम बँटन, नितीश राणा, शुबमन गिल, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसल असे नावाजलेले फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. KKRकडून शुबमन गिलने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली झुंज दिली. पण त्याच्या खेळीचा फारसा प्रभाव पडला नाही.