आयपीएलचा सहावा हंगाम सुरू व्हायला आता फक्त काही दिवसांचा अवधी आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर आपल्या सरावाला शुक्रवारी प्रारंभ केला. कर्णधार रिकी पाँटिंग वानखेडेवर आवर्जून उपस्थित होता, परंतु त्याने प्रत्यक्षात सरावात भाग घेतला नाही.
३८ वर्षीय पाँटिंगने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. परंतु यंदा तो आयपीएल हंगामासाठी सज्ज झाला आहे. त्याने संघाचे मार्गदर्शक अनिल कुंबळे, मुख्य प्रशिक्षक जॉन राइट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्स यांच्याशी सल्लामसलत केली.
फेब्रुवारी महिन्यात चेन्नईला झालेल्या आयपीएल लिलावामध्ये पाँटिंगला मुंबई इंडियन्सने चार लाख अमेरिकन डॉलर्स या आधारभूत किंमतीलाच खरेदी केले. शुक्रवारी झालेल्या सरावात अ‍ॅडेन बिझार्ड, नॅथन कल्टर-निले, दिनेश कार्तिक, प्रग्यान ओझा, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, सुशांत मराठे, सूर्यकुमार यादव यांनी भाग घेतला.

मुंबई इंडियन्सचा ‘स्मॅश’शी करार
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने ‘स्मॅश’ या कंपनीशी करार केला असून ‘अख्खा मुंबई खेलेगा’ या कार्डचे अनावरण करण्यात आले. या कार्डद्वारे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना ‘स्मॅश’ या खेळकेंद्रामध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा सामना करण्याची संधी मिळणार आहे. अनावरणप्रसंगी मुंबई इंडियन्सचा अव्वल फलंदाज सचिन तेंडुलकर आणि मुख्य प्रशिक्षक जॉन राइट उपस्थित होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना ४ एप्रिल रोजी बंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे.

पुणे वॉरियर्स संघात क्लार्कऐवजी फिन्च
पुणे : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मायकेल क्लार्क हा दुखापतीमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा आरोन फिन्च याला पुणे वॉरियर्स संघात स्थान देण्यात आले आहे. पुणे वॉरियर्सची मालकी असलेल्या सहारा परिवारातर्फे एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात असताना तिसऱ्या कसोटीत क्लार्क याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे तो चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता आणि तो उपचाराकरिता मायदेशी परतला होता. या मोसमात तो खेळू शकणार नसल्यामुळेच फिन्च याला संधी मिळाली आहे. यापूर्वी फिन्चने राजस्थान रॉयल्स व दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले होते.