रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आयपीएल २०१८ मधील सर्वात उत्तुंग षटकार ठोकला आहे. बुधवारी (दि.२५) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरोधात खेळताना डिव्हिलियर्सने हा गगनभेदी षटकार ठोकला. मिड-विकेटच्या दिशेने त्याने १११ मीटर लांब सीक्स मारला. आयपीएल २०१८ मधील दुसरा सर्वात लांब षटकारही (१०६ मीटर) डिव्हिलियर्सच्याच नावावर आहे. मुंबई इंडियन्सविरोधात त्याने हा षटकार ठोकला होता.

डिव्हिलिअर्सने सामन्यातील ११ व्या षटकात इम्रान ताहिरच्या चौथ्या चेंडूवर चेंडू आकाशात भिरकावला. हा फटका इतका जोरात मारला होता की बॉल थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. त्यानंतर नव्या चेंडूने खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. लांब षटकार मारण्याच्या बाबतीत तीस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू आहेत. तीन नंबरवर आंद्रे रसेल(१०५ मीटर), चौथ्या क्रमांकावर ख्रिस लिन(१०३ मीटर) आणि पाचव्या क्रमांकावर कर्णधार दिनेश कार्तिक(१०२) आहेत.

या सामन्यात डिव्हिलिअर्सने अवघ्या ३० चेंडूत ६८ धावांची अजून एक तुफानी खेळी केली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बंगळुरूने २०५ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, २०६ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने धोनी आणि रायडूच्या दणकेबाज खेळीमुळे २ चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला.

पाहा व्हिडीओ –