आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाला राजस्थानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचा प्ले ऑफ चा मार्ग अधिक खडतर झाला आहे. आज मुंबईचा सामना पंजाबविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवर मुंबईचे विजयाची टक्केवारी ६१ टक्के आहे. त्यामुळे मुंबईचा संघ आज दुप्पट आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल यात शंका नाही.

लिलावाच्या वेळी खरेदी केलेला मुंबईकर यष्टीरक्षक आदित्य तरे यालाही मुंबईच्या विजयची आणि प्ले ऑफ मध्ये पात्र ठरण्याची आशा आहे. मात्र आदित्यला मुंबईकडून अद्याप या हंगामात एकही सामना खेळता आलेला नाही. संघ व्यवस्थापनाने त्याच्याऐवजी झारखंडच्या इशान किशनला पसंती दर्शवली आहे. आयपीएलच्या मुंबईच्या संघात मुंबईकर खेळाडूंची असलेली कमतरता त्यांच्यासाठी नेहमीच टीकेचे कारण ठरली आहे. पण मुंबईकर आदित्य तरेने मात्र त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

आदित्य म्हणाला की किशन हा एक १९ वर्षाचा युवा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये त्याला गती आहे. त्याची प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणूनच मुंबईचे संघ व्यवस्थापन किशनला प्राधान्य देत आहे. त्याच्या कारकिर्दीची ही सुरुवात आहे. त्यामुळे मुंबईकडून आयपीएलमध्ये खेळणे ही त्याच्यासाठी सुवर्णसंधी आहे आणि तो या संधीचा सोने करत आहे.

किशनची फलंदाजी अफलातून आहे. यंदाच्या हंगामात त्याने काही सामने मुंबईला एकहाती जिंकवून दिले आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणूनही त्याची प्रतिभा दाखवून दिली आहे. मुंबईतर्फे हंगामातील सर्व सामने खेळल्याचा अनुभव त्याला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत नक्कीच उपयोगी ठरेल, असेही आदित्य म्हणाला.

संघाबाहेर बसण्याबाबतही आदित्य मोकळेपणाने बोलला. आयपीएलमधील माझा हा नववा हंगाम आहे. मी या काळात अनेकदा संघाबाहेर बसलो आहे. त्यामुळे मला या गोष्टी कशापद्धतीने हाताळाव्या, त्याचा अंदाज आहे, असे मत त्याने व्यक्त केले.