जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अॅन्ड्रयू टाय याने ४ विकेट घेतल्या. टायच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पंजाबने राजस्थानला अवघ्या १५८ धावांवर रोखलं. पण त्याच्या दमदार प्रदर्शनानंतरही राजस्थानकडून पंजाबला १५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

या सामन्यात ४ विकेट घेऊन टाय आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. राजस्थानची फलंदाजी संपल्यानंतर सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून अॅन्ड्रयू टायला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मीथच्या हस्ते पर्पल कॅप देण्यात आली. टायच्या नावावर आतापर्यंत १६ बळी आहेत. मात्र, पर्पल कॅप भेटताच टायला अश्रू अनावर झाले, आणि तो ढसाढसा रडायला लागला.

भावूक झालेला टाय म्हणाला, ‘माझ्यासाठी हा सामना खूप भावूक होता…आजचा दिवस खूप माझ्यासाठी प्रचंड खडतर होता. मला नेहमीच क्रिकेट खेळायला आवडतं… पण आजच माझ्या आजीचं निधन झालं… त्यामुळे आजचं माझं प्रदर्शन आजीला आणि संपूर्ण कुटुंबियांना समर्पित करतो’.

त्यानंतर भावूक झालेल्या टायचं ग्रॅमी स्मीथने सांत्वन केलं. सामन्यादरम्यानही टायने आजीच्या आठवणीत हातावर काळीपट्टी बांधली होती, त्यावर ‘गॅंडमा’ असं लिहिलं होतं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज असलेल्या टायला पंजाबच्या संघाने ७.२० कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
पाहा व्हिडीओ –