दोन वर्षांच्या बंदीवासानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) व्यासपीठावर परतलेल्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या आतापर्यंतच्या रुबाबाला साजेसा खेळ दाखवत सातव्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. धीम्या खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या तुटपुंज्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. परंतु सलामीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिसने हिंमतीने किल्ला लढवत भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह षटकार खेचून चेन्नईला दोन विकेट राखून रोमहर्षक विजय साकारुन दिला.

हैदराबादचा पराभव करुन अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केलं. ड्रेसिंग रुममध्येही हा आनंद साजरा होत होता. सेलिब्रेशन करायचं म्हटलं की ड्वेन ब्राव्हो नेहमीच मैदानात आणि मैदानाबाहेर सर्वात पुढे असतो. ड्रेसिंग रुममध्येही ड्वेन ब्राव्होने डान्स करत सेलिब्रेशन केलं. यावेळी महेंद्रसिंग धोनी समोरच बसला होता. हरभजन सिंगनेही यावेळी ब्राव्होला साथ दिली. धोनी मात्र हसून हे सर्व पाहत होता.

दक्षिण आफ्रिकी फलंदाज फाफ डु प्लेसिसने एका बाजूने संयमी फलंदाजी करत चेन्नईच्या संघाला आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत आणून सोडलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने सनराईजर्स हैदराबाद संघावर २ गडी राखून मात केली. हैदराबादने विजयासाठी दिलेलं १४० धावांचं आव्हान पेलवताना चेन्नईच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आले होते. सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी टिच्चून मारा करत चेन्नईवर दडपण आणलं होतं. मात्र डुप्लेसिसला बाद करण्यात हैदराबादचे गोलंदाज अयशस्वी ठरले. डु प्लेसिसचा अपवाद वगळता चेन्नईचा एकही फलंदाज मैदानात तग धरु शकला नाही. अखेरच्या फळीत शार्दुल ठाकूरने १९ व्या षटकात फटकेबाजी करत डुप्लेसिसला चांगली साथ दिली.

हैदराबादकडून राशिद खानने ४ षटकात केवळ ११ धावा देत २ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला सिद्धार्थ कौल, संदिप शर्मा यांनी प्रत्येकी २-२ तर भुवनेश्वर कुमारने १ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या षटकांत डुप्लेसिसवर नियंत्रण राखण्यात हैदराबादचे गोलंदाज अयशस्वी ठरले.

त्याआधी चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यासमोर हैदराबादचेही फलंदाज पुन्हा एकदा कोलमडले. अंतिम फेरी गाठण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं असलेल्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.