बेंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) हाडवैर सर्वश्रुत आहे. बेंगळूरुचा संघनायक विराट कोहली, तर चेन्नईचा महेंद्रसिंग धोनी. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू. दोन वर्षांनंतर चेन्नईचा संघ पुन्हा आयपीएलच्या क्षितिजावर परतल्याने चालू हंगामात प्रथमच बुधवारी या दोन संघांमधील धुमश्चक्री क्रिकेटरसिकांना अनुभवता येणार आहे.

मागील दोन हंगामांमध्ये चाहत्यांना बेंगळूरु-चेन्नई लढत नसल्याची उणीव भासत होती. या दोन्ही संघांमधील आतापर्यंतच्या आयपीएल लढतींची तुलना केल्यास चेन्नईने १३ सामने जिंकले आहेत, तर बेंगळूरुने ७ सामने जिंकले आहेत. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या मोठय़ा धावसंख्येच्या ७ सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले असून, एक सामना निकाली लागला नव्हता.

यंदाच्या हंगामाचा जरी आढावा घेतला तरी पुनरागमन करणारा धोनीचा चेन्नई संघ हा बेंगळूरुपेक्षा सरस आढळतो. चेन्नईने आतापर्यंतच्या ५ पैकी ४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर बेंगळूरुला ५ पैकी फक्त २ सामने जिंकता आले आहेत.

एबी डी’व्हिलियर्सला अपेक्षित सूर गवसला आहे, ही बेंगळूरुसाठी सुखद गोष्ट ठरेल. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ३९ चेंडूंत ९० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यामुळेच दिल्लीचे १७५ धावांचे आव्हान दोन षटके शिल्लक असतानाच बेंगळूरुने पार केले. विराटने राजस्थान रॉयल्सविरुद्ध वेगवान ५७ धावा केल्या, तर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ९२ धावा काढल्या. विराटचा फॉर्मसुद्धा बेंगळूरुचा आत्मविश्वास उंचावणारा आहेत. याशिवाय क्विंटन डी कॉक आणि मनन व्होरा हेसुद्धा उपयुक्त खेळी साकारत आहेत.

चेन्नईची प्रमुख मदार अष्टपैलू शेन वॉटसनवर आहे. राजस्थानविरुद्ध त्याने ५७ चेंडूंत १०६ धावांची दमदार खेळी साकारली होती. अंबाती रायुडू अप्रतिम फॉर्मात आहे. ५ सामन्यांमध्ये त्याने सर्वाधिक एकूण २०१ धावा केल्या आहेत. यापैकी ७९ या त्याच्या सर्वोच्च धावा आहेत. सुरेश रैना (एकूण ११८ धावा) हासुद्धा चेन्नईच्या फलंदाजीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. याचप्रमाणे धोनी (एकूण १३९ धावा) आणि ड्वेन ब्राव्हो (एकूण १०४ धावा) महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी देण्यासाठी सज्ज असतात.

युजवेंद्र चहल (एकूण ५ बळी) आणि वॉशिंग्टन सुंदर (एकूण ४ बळी) यांच्यावर बेंगळूरुच्या फिरकीची भिस्त असेल. यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ फिरकीसमोर झगडताना आढळत आहे. अष्टपैलू ख्रिस वोक्सने अप्रतिम कामगिरी बजावताना ८ बळी घेतले आहेत, तर वेगवान गोलंदाज उमेश यादवच्यासुद्धा ८ बळी खात्यावर आहेत.

’ सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, सिलेक्ट १ आणि एचडी.