बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळालं. कधी सामन्याचं पारडं धोनीच्या चेन्नईकडे तर कधी कोहलीच्या बंगळुरूकडे झुकत होतं. कधी कोहलीची तर कधी धोनीची रणनिती यशस्वी होत होती.

सामना कोण जिंकणार हे अखेरपर्यंत समजत नव्हतं. त्यामुळे स्टेडियममध्ये अथवा टीव्हीसमोरील प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढत होतेच पण पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या दोन्ही खेळाडूंच्या पत्नींचेही हृदयाचे ठोके वाढत होते. कधी साक्षी धोनी चेन्नईसाठी चिअर करत होती तर कधी अनुष्का शर्मा बंगळुरूसाठी टाळ्या वाजवायची. अटीतटीचा सामना होता. धोनीच्या प्रत्येक षटकारावर साक्षी जोरजोरात टाळ्या वाजवताना दिसली तर चेन्नईची विकेट गेल्यावर अनुष्काचा आनंद चेह-यावरुनच दिसत होता. अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेरीस धोनीचा चेन्नई संघ विजयी ठरला.

  • साक्षी धोनी चेन्नईच्या जवळपास सर्व मॅच पाहण्यास उपस्थित असते, तिच्यासोबत मुलगी जिवा ही देखील मस्ती करताना दिसते. आज धोनीच्या धमाकेदार खेळीनंतर दोघीही आनंदी होत्या.
  • अनुष्का आणि विराट यांच्या लग्नानंतर हे पहिलंच आयपीएलचं सत्र आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून अनुष्का शर्माही बंगळुरूचे सामने पाहण्यास मैदानात पोहोचते. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही तिने या सामन्याचा आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं.