स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर, आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नईने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नईने दमदार पुनरागमन केलं आहे. मात्र चेपॉकच्या मैदानावर घरचे सामने खेळता न आल्याची खंत धोनीच्या मनात अजुनही कायम आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवेपर्यंत संघाचा थरारक प्रवास चेपॉकवर चाहत्यांना अनुभवता आला नाही, याचं आपल्याला वाईट वाटत असल्याचं धोनीने म्हटलं आहे. अंतिम सामन्याआधी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत धोनी बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2018 – जेव्हा संतापलेल्या दिनेश कार्तिकच्या तोंडून अपशब्द निघतात…

तामिळनाडू व कर्नाटक राज्यांमधली कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन महिन्याभरापूर्वी चेन्नईत मोठा संघर्ष सुरु होता. तामिळनाडूच्या वाट्याला कमी पाणी आल्यामुळे तामिळी संघटनांनी आयपीएलला आपला विरोध दर्शवला होता. काही राजकीय संघटनांनी रस्त्यावर येत आयपीएल सामन्यांविरोधात निदर्शन केली. चेन्नई सुपरकिंग्जच्या चेपॉक मैदानातील पहिल्या सामन्यातही काही संघटनांनी मैदानात शिरत आपला विरोध व्यक्त केला. यानंतर तामिळनाडू पोलिसांनी आयपीएलच्या सामन्यांना संरक्षण देण्यासाठी असमर्थता दर्शवली. यानंतर बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने चेन्नईच्या संघाला पुणे, विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, राजकोट अशा ठिकाणांचा पर्याय दिला. यामध्ये चेन्नईने पुण्याच्या मैदानाला आपली पसंती दर्शवली.

चेपॉकच्या मैदानावर सामने खेळता येणार नाही हे समजल्यावर मला सुरुवातीला प्रचंड त्रास झाला होता, कारण आमच्या हक्काच्या प्रेक्षकांना आमचा खेळ पाहता येणार नव्हता. मात्र स्पर्धा सुरु झाल्यानंतर तुम्हाला भावनिक विचार करुन चालत नाही. पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवण्यात आलेल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने ३ वेळा विजेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाची अंतिम फेरी जिंकून चेन्नई मुंबईच्या ३ विजेतेपदांशी बरोबरी करु शकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2018 – ‘या’ ५ गोष्टी मिळवून देऊ शकतात हैदराबादला चैन्नईवर विजय…