नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची झुंज गुरुवारी अव्वल स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. मागील सामन्यांमध्ये झालेल्या चुकांतून बोध घेत विशेष कामगिरी करून दाखवण्याची संधी दिल्लीला असली तरी, त्यासाठी त्यांना सर्व आघाडय़ांवर चमकदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

गौतम गंभीरकडून कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे आल्यानंतर दिल्लीचा संघ आधीपेक्षा चांगली कामगिरी करीत आहे. मात्र मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका त्यांना महागात पडत आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यावर सर्वाच्या नजरा असतील. याशिवाय श्रेयस आणि ऋषभ पंत हे दोन्ही फलंदाज पूर्ण बहरात आहेत. ग्लेन मॅक्सवेलने दिल्लीची निराशा केलेली असली तरी त्याला अजून एक संधी मिळू शकते. अमित मिश्राने जलदगती गोलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली असल्याने त्याच्यासमवेत अजून एखाद्या फिरकी गोलंदाजाचा संघात समावेश करण्याचा विचार दिल्लीचा संघ करू शकतो.

दुसरीकडे हैदराबादच्या संघासाठी सारे काही मनाप्रमाणे घडत आहे. अ‍ॅलेक्स हेल्सने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्याप्रमाणेच शिखर धवनला प्रारंभीच्या दोन सामन्यांमध्ये मिळालेली लय पुन्हा गवसेल अशी हैदराबादला अपेक्षा आहे. हैदराबादची गोलंदाजी ही त्यांची सर्वाधिक प्रभावी बाजू असून ते कोणत्याही संघाला रोखू शकतात. कर्णधार केन विल्यमसन स्वत: अत्यंत चांगली कामगिरी आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.