नवी दिल्ली : बाद फेरीत पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध होणारा सामना हा अधिकाधिक प्रयोग करीत आपली कामगिरी उंचावण्याची संधी राहणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील या सामन्याच्या निकालाने बाद फेरीवर कोणताही परिणाम होणार नाही.

गुणतालिकेत द्वितीय स्थानावर असलेल्या चेन्नईला आता सर्वोच्च स्थानाचे ध्येय खुणावते आहे. चेन्नईच्या खेळाडूंनी घरच्या मैदानासह पुण्याच्या मैदानावरदेखील चांगली लय कायम राखली असल्याने त्यांना बाद फेरीत सहजपणे प्रवेश मिळवणे शक्य झाले आहे. प्रथम स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबादविरुद्धदेखील चेन्नईने दमदार कामगिरी नोंदवली आहे.

चेन्नईच्या सलामीवीरांनी हंगामात अत्यंत दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करतानादेखील या सलामीवीरांनी चांगली पायाभरणी केली असल्यानेच त्यांना लक्ष्य गाठणे शक्य झाले आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रायुडूची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. चेन्नईकडून शेन वॉटसन आणि  स्वत: धोनीदेखील फलंदाजीत चमकत असल्याने त्यांना फलंदाजीची फारशी चिंता नाही. गोलंदाजीत कुणाही एका गोलंदाजाने फारशी चमक दाखवलेली नसली तरी सर्व गोलंदाज बऱ्यापैकी कामगिरी करीत आहेत.हरभजनसिंग आणि रवींद्र जडेजा यांनी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात यश मिळवले असले तरी बळी मिळवण्यात तितकीशी चमक दाखवलेली नाही. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला त्यांच्या गोलंदाजीत प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे दिल्लीला आता केवळ आत्मसन्मान कायम राखण्यासाठी आणि कामगिरी सुधारण्यासाठी खेळायचे आहे. व्यवस्थापनाने मागील सामन्यात नेपाळी युवक संदीप लामीच्चाने, अभिषेक शर्मा आणि ज्युनिअर दाला यांना बंगळूरुविरुद्ध संधी दिली. त्यातील संदीप व अभिषेकने चांगली कामगिरी करून दाखवल्याने या सामन्यातदेखील त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

’ सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस