आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. धोनीच्या संघाला शुक्रवारच्या सामन्यात दिल्लीकडून ३४ धावांनी हार पत्करावी लागली होती. मात्र असे असले तरी या सामन्यात धोनीने आपल्या टी२० कारकिर्दीतील एक मोठी कामगिरी पार पाडली.

दिल्लीने या सामन्यात २० षटकात १६२ धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ केवळ १२८ धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात धोनीने १७ धावा केल्या. या धावसंख्येचा मदतीनेच धोनीने टी२० कारकिर्दीतील ६ हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी त्याने २९० सामन्यांमध्ये केली. यात आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल अशा दोन्ही प्रकारच्या सामन्यांचा समावेश आहे.

ही कामगिरी करणारा धोनी ५वा भारतीय खेळाडू ठरला. याआधी डावखुरा फलंदाज सुरेश रैना, कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनी ६ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

आयपीएलमधील ४ हजार धावांच्या टप्प्यापासूनही केवळ ९ धावा दूर…

धोनीने टी२० कारकिर्दीतील ६ हजार धावांचा टप्पा गाठलाच. पण त्याबरोबरच धोनी आयपीएलमधील ४ हजार धावांच्या अगदी जवळ आहे. धोनीच्या सध्या १७२ आयपीएल सामन्यात ३ हजार ९९१ धावा आहेत. त्याला हा टप्पा गाठण्यासाठी केवळ ९ धावांची गरज आहे. आयपीएलमध्ये हा टप्पा गाठणारे केवळ ६ फलंदाज आहेत. या हंगामात धोनीने १३ सामन्यांत ४३० धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचा फॉर्म पाहता तो साखळी सामन्यातच ४ हजार धावांचा टप्पा गाठेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.