कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी राजस्थान रॉयल्ससोबत झालेल्या सामन्यात सात गडी राखत विजय मिळवला. या विजयात कर्णधार दिनेश कार्तिकने महत्त्वाचं योगदान दिलं. ४२ धावांच्या जबरदस्त खेळीसोबत दिनेश कार्तिकने विकेटकीपिंगमध्येही आपला जलवा दाखवला. दिनेश कार्तिकने विकेटकीपिंग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेची घेतलेली विकेट सध्या चर्चेचा विषय असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विजेच्या गतीने दिनेश कार्तिकने घेतलेली विकेट पाहून अनेकांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. अनेकांनी तर धोनीदेखील हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित होईल असं म्हटलं आहे.

सातव्या ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजी करत होता. ३६ धावांवर खेळत असताना नितीश राणाच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पॅडला लागून तिथेच थांबला. त्याचवेळी दिनेश कार्तिकने झेप घेत बॉल स्टम्पच्या दिशेने फेकत अजिंक्य रहाणेला रन आऊट केलं. दिनेश कार्तिकचा हा रन आऊट पाहून अजिंक्य रहाणेही आश्चर्यचकित झाला होता. दिनेश कार्तिकने अजिबात वेळ न दवडता त्याच स्थितीत हात फिरवून चेंडू स्टम्पवर फेकला होता. त्याची ही स्टाइल पाहून अनेकांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.

कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने आठ विकेट गमावत १६० धावा केल्या. कोलकाताने १८.५ ओव्हरमध्येच तीन विकेट गमावत आव्हान पूर्ण केलं. कार्तिकने षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोलकाता आतापर्यंत पाच सामने खेळला असून तीनमध्ये विजय मिळवला आहे, तर राजस्थानला चौथ्या सामन्यात दुस-या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.