स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात काल मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा १४ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे मुंबईसाठी स्पर्धेतील पुढचा प्रवास अधिक खडतर बनला आहे. मुंबईला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आता पुढेच सर्व पाच सामने जिंकावेच लागतील. गोलंदाजी करताना आपल्या संघाने १०-१५ अतिरिक्त धावा दिल्या त्याचा फटका बसला असे रोहित शर्माने सांगितले.

रोहित म्हणतोय त्यात तथ्य आहे कारण या मॅचचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल कि, या सामन्यात दोन टर्निंग पॉईंट ठरले. मुंबईची गोलंदाजी सुरु असताना १० व्या षटकात हार्दिक पांडयाच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या ब्रँडन मॅक्युलमने एका चेंडूत १३ धावा वसूल केल्या.

हार्दिकच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅक्युलमने षटकार ठोकला. हार्दिकने छातीच्या उंचीवर हा चेंडू टाकल्याने पंचांनी नो बॉल दिला. त्यानंतर पुढच्या फ्रि हिट असलेल्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला. नो बॉलची एक धाव मिळून एकाच चेंडूवर १३ धावा वसूल केल्या. असाच प्रकार पुन्हा २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडला. फक्त गोलंदाज आणि फलंदाज बदलले होते.

मिचेल मॅक्लेघानच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॉलीन डी ग्रँडहोमने षटकार ठोकला. पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला. त्याच्याच पुढच्या चेंडवूर कॉलीनने पुन्हा षटकार ठोकला. नो बॉलची एक धाव मिळून पुन्हा एकाच चेंडूवर १३ धावा गेल्या. हे दोन नो बॉल मुंबईला बरेच महाग पडले. अन्यथा आरसीबीला १५० धावांवर रोखता आले असते.