चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या ११ व्या मोसमातला पहिलावहिला सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने चेन्नईपुढे विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईच्या गोलंदाजीपुढे काहीशी संथ सुरुवात केल्याने मुंबईच्या टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र १६६ धावांचे लक्ष्य गाठतानाही चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजांच्या तोंडी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी फेस आणला होता.

मुंबईने चेन्नईच्या ८ विकेट काढल्या. अशात आपल्या संघाच्या म्हणजेच चेन्नईच्या मदतीला धावला तो ब्राव्हो. ब्राव्होने ७ षटकार, ३ चौकार मारत ३० चेंडूत ६८ धावांची खेळी केली. त्यामुळेच विजयाचा घास मुंबईच्या तोंडून अक्षरशः हिरावला गेला. चेन्नईसाठी ब्राव्हो हिरो ठरला. आज त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडी डीजे… ब्राव्हो हेच गाणे असेल यात काहीही शंका नाही. ब्राव्होने ते करून दाखवले जे अशक्यप्राय वाटत होते.

ब्राव्होच्या आक्रमक आणि धडाकेबाज खेळीने अख्खा सामना फिरला. मुंबई जिंकणार असे वाटत असतानाच ब्राव्होने त्यात मोडता घातला आणि आपल्या तळपत्या बॅटने षटकारांची आतषबाजी करत विजय अक्षरशः आपल्या संघाकडे खेचून आणला. त्यानंतर एक मोठा फटका मारताना तो झेलबादही झाला. मात्र तेव्हा लक्ष्य उरले होते ते फक्त ६ चेंडूत ७ धावांचे केदार जाधवने ते सहज शक्य केले. तरीही चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मात्र ब्राव्होच! ब्राव्होला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊनही गौरवण्यात आले. मुंबई इंडियन्स जिंकणार असे वाटत असतानाच आक्रमक खेळी करत आणि आपल्या बॅटचा प्रताप दाखवत ब्राव्होने विजयाची वाट सुकर करून दिली.